मालेगाव : शहरातील यंत्रमाग सनद मंदीच्या सावटाखाली आहे .व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. व्यावसायिकांना वाढीव सबसिडी देत कमी दरात वीजपुरवठा केला तरच यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असे माजी आमदार आसिफ शेख यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठकीत स्पिनिंग मिल व यंत्रमाग व्यवसायांच्या अडचणींविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत माजी आमदार शेख यांनी यंत्रमाग व्यवसायाच्या अडचणी मांडल्या. सुताचे दर वाढत असताना कापड स्वस्त दरात विकावे लागत आहे. उत्पादन खर्च व नफ्याचा ताळमेळ बसत नसल्याने शहरातील बुनकर आर्थिक संकटात सापडले आहेत. ऑनलाईन नाेंदणीची किचकट प्रक्रिया रद्द करण्याची विनंती केली. वाढीव सबसिडी, वाजवी दरात वीज उपलब्ध केल्यास यंत्रमाग व्यवसाय टिकेल, असे शेख यांनी स्पष्ट केले. शहरात कामगारांची माेठी संख्या आहे. सरकारने असंघटीत कामगार बाेर्डाची स्थापना केली हाेती. या बाेर्डास ५० काेटींचा निधी दिल्याचा याचा कामगारांना लाभ हाेईल, असे सांगितले. बैठकीस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वस्त्राेद्याेग मंत्री अस्लम शेख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्याक विकास मंत्री विश्वजीत कदम, शंभुराजे देसाई आदी उपस्थित हाेते.
यंत्रमाग व्यावसायिकांना कमी दरात वीज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:13 AM