नाशिक : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सर्व विभागांचे नियोजन पूर्ण झाले असले तरी, प्रशासकीय मान्यता देऊन कामांची यादी बांधकाम विभागाला पाठविण्यास विविध विभागांकडून विलंब होत असल्याची बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक विभागाने आजच्या आज संबंधित याद्या बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी या विषयावर चर्चा झाली. अनेक विभागांनी आपले नियोजन पूर्ण करून कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. परंतु बांधकाम विभागाकडे कामांची यादी देण्यात आली नसल्याची बाब आत्माराम कुंभार्डे यांनी निदर्शनास आणून दिली. प्रशासकीय मान्यता देण्यात आली असेल तर याद्या दडवून ठेवण्याचे कारण काय, अशी विचारणा त्यांनी केली. जर याद्या बांधकाम विभागाकडे देण्यात आल्या नाहीत तर कामांचे अंदाजपत्रक कधी तयार करणार व निविदा कधी काढणार, कामे कशी पूर्ण होणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सर्व खातेप्रमुखांना सदरच्या याद्या तत्काळ पाठविण्याच्या सूचना केल्या. या सभेत किरण थोरे यांनी म्हरळगोई येथील शाळा निर्लेखित होऊन वर्षाचा कालावधी उलटला तरीदेखील शाळा पाडली जात नाही. जर भविष्यात ही शाळा कोसळून अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतही निर्लेखित झाली असून, या ठिकाणी कुत्र्यांचा वावर असल्याची बाब थोरे यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर चालू आर्थिक वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तरतूद करण्यात आली असून, नवीन इमारत बांधण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. याच वेळी भास्कर गावित यांनी सुरगाणा तालुक्यातील काही गावांमध्ये शौचालयांची कामे होऊनही ग्रामस्थांना शौचालयाचे अनुदान मिळाले नसल्याची तक्रार केली. या सभेस उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, सभापती संजय बनकर, अश्विनी आहेर, सुशीला मेंगाळ, सुरेखा दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपस्थित होते.पिंपळगावला होणार फायर स्टेशनग्रामपंचायत विभागाने नागरी सुविधेच्या कामांचे नियोजन पूर्ण केले असून, यातील काही निधीतून पिंपळगाव बसवंत येथे अग्निशमन केंद्र उभारण्याचे सूतोवाच मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. त्यासाठी निधी पुरेसा नसला तरी, जिल्हा नियोजन समितीकडून अतिरिक्त निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नियोजनाच्या याद्या बांधकाम विभागाला द्या:बाळासाहेब क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 1:24 AM
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सर्व विभागांचे नियोजन पूर्ण झाले असले तरी, प्रशासकीय मान्यता देऊन कामांची यादी बांधकाम विभागाला पाठविण्यास विविध विभागांकडून विलंब होत असल्याची बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक विभागाने आजच्या आज संबंधित याद्या बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केल्या आहेत.
ठळक मुद्देजि.प. च्या स्थायी समिती सभेत चर्चा