संदीप भालेराव, नाशिक: जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा आणि पाण्यासाठी असलेली मागणी यांचा विचार करता यंदा पाणी नियोजनासाठी जिल्ह्याला कसरत करावी लागणार आहे. दरवर्षी साधारणपणे जुलै अखेरपर्यंतचे नियोजन करावे लागते. परंतु पुढीलवर्षीसाठी ऑगस्ट पर्यत पाणी पुरेल यासाठी नियोजन करावे लागणार आहे. याबाबतच्या सुचना पालकमंत्री दादा भूसे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात यंदा ७० ते ७५ टक्के इतकाच पाऊस झाला असून धरणे देखील मागीलवर्षी पेक्षा कमी भरली आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील लघु आणि मध्यम धरणांमधील पाण्याचा साठा ८३ टक्के इतका आहे. त्यातच जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश असल्याने जिल्ह्यातील पाणी वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी जलसंपदा विभागाला नियोजनासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने, जिल्ह्यातील पाणीसाठा कमी आहे. पर्जन्यमानाची परिस्थिती बदलत असल्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी पाणी नियोजन बैठकीत सांगितले. परतीचा पाऊसही यंदा होऊ शकला नाही. त्यामुळे निश्चित पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. यापूर्वी जुलैअखेरपर्यंत आपण नियोजन केले जात होते यंदाची परिस्थिती पाहता, ऑगस्टअखेरपर्यंत नियोजन करावे लागणार असल्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिल्या.