राज्याच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील सप्तशृंगी गडावरील पाणी टंचाई व इतर विकास कामासाठी तसेच ओतूर व श्रीभुवन प्रकल्पासाठी भरीव तरतूद केल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाचे सचिव, मुख्य अभियंता व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे निर्देश दिले होते तर श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाची नोव्हेंबर २०२० मध्ये जयंत पाटील यांनी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी श्रीभुवन परिसरातील पाणी प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली होती. ओतूर धरणाचा जुना सांडवा तोडून नव्याने काँक्रिटमध्ये सांडवा बांधण्यात येणार असून नवीन धरणासाठी जुन्या धरणाचे मटेरियल न वापरता नवीन गुणवत्तेचे साधन- साहित्य वापरण्यात येणार आहे. नवीन ओतूर धरण पूर्ण लांबीत नव्याने करण्यात येणार असून त्यासाठी ३९ कोटी २८ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ओतूर धरणातील अवैशिष्ट कामे, शिल्लक कामे,विशेष दुरुस्ती अंतर्गत अर्थसंकल्पात विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्यात आली आहे. श्रीभुवन प्रकल्प नवीन असून प्रकल्पाची किंमत ३३ कोटी रुपये आहे. अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद केल्याने प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे २.४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार असून २२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
इन्फो
ओतूर धरण एक कहाणी
ओतूर धरणाची मूळ प्रशासकीय मान्यता सन १९७१ मध्ये मिळून धरणाच्या कामास १९७२ मध्ये सुरुवात झाली होती. १९७६ मध्ये हे धरण पूर्ण झाले. त्यावेळी प्रकल्पासाठी ३७ लाख रुपये खर्च झाला होता.
१९७७ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली. त्यामुळे स्व. ए. टी. पवार यांनी गळती प्रतिबंधक दुरुस्ती कामास २०११ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळवली. त्याअनुषंगिक कामांसाठी ७ कोटी १२ लाख रुपये मंजूर केले. २४ महिने मुदतीत धरण पूर्ण करण्याचे निर्देश होते मात्र काहीही काम न होता
प्रकल्पावर १ कोटी ८ लाख रुपये खर्च झाला. धरणाचे काम गेल्या ६ वर्षांपासून ठप्प आहे. आता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत.