नाशिक : ‘किती हाससी बा गोड गोड लडिवाळा’, ‘तव शिष्यांची वृत्ती दूर साराया, जागतोसी का रे राया’ यांसह विविध पाळणागीतांनी बह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्मसोहळा बुधवारी (दि.८) गंगापूररोड येथील गोंदवलेकर महाराज मंदिरात धार्मिक वातावरणात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.बुधवारी सकाळी साडेआठ वाजता महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक फुलांनी सजवलेल्या पाळण्यात महाराजांची प्रतिमा आणि पादुका विराजमान करून पाळणागीत तसेच विविध स्तोत्रं आणि मंत्रांच्या जयघोषात महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच काकड आरतीने विविध धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. जन्मसोहळ्यानंतर सुनीलबुवा कुलकर्णी यांनी आपली कीर्तनसेवा अर्पण केली. माध्यान्ह आरतीनंतर मंदिरात महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीन हजारांहून अधिक भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याचे विश्वस्तांनी सांगितले. जन्मोत्सवाच्या पूजेचा मान प्रसाद कुलकर्णी यांना मिळाला, तर या उत्सवाचे पौरोहित्य रवींद्र देव यांनी केले.या जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी आमदार सीमा हिरे, एस. एल. देशपांडे, सुभाष देव, गिरीश भगूरकर यांच्यासह मंदिराचे विश्वस्त, भाविक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
स्तोत्रं - मंत्रांच्या जयघोषात गोंदवलेकर महाराजांचा जन्मसोहळा
By admin | Published: February 10, 2017 12:45 AM