नाशिक : दुचाकी चालवताना ‘हेल्मेट’ आणि चारचाकी चालवितांना ‘सीटबेल्ट’ किती महत्त्वाचे आहे, याबाबत नाशिकमध्ये खुद्द गणपती बाप्पाच जनजागृती करीत असून पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, गणशोत्सव मंडळ व सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून हा अनोखा उपक्रम गंगापूर नाका सिग्नलवर मंगळवारी (दि़१८) राबविण्यात आला़
गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी बाप्पा विराजमान झाले आहेत़ शहरात बहुतांशी दुचाकी व चारचाकीचालक हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करीत नाहीत तसेच वाहतुक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असून अपघातात आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत़ त्यामुळे खुद्द गणपती बाप्पांनीच गंगापूर रोड सिग्नलवर वाहनचालकांना हेल्मेट, सीटबेल्ट व वाहतूक नियमांचे धडे दिले़
नाशिकच्या रस्त्यावर श्रीगणेशाच्या वेशातील चौघे ढोल पथकाच्या साथीने रस्त्यावर फिरत लोकांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देत होते. गणेशाची वेशभुषा केलेल्यांच्या हातामध्ये ‘भक्ता, दुचाकीवर हेल्मेट नक्की वापर, कारण प्रत्येकालाच माझ्यासारखं डोकं बदलून मिळेलच असे नाही ’हे फलक होते़ अनेकजण वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवतात. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि त्यांचा अवलंब करावा यासाठी नाशिक पोलिसांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला.
यावेळी नागरिकांनी गणेशाची वेषभुषा केलेल्यांची वाहतूक नियमांवर रचलेली आरती पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, महेश देवीकर, फुलदास भोये, नाशिकचा राजा मंडळाचे समीर शेटे यांनी म्हटली़ तर एका महिलेने हेल्मेटमुळे पतीचे प्राण वाचल्याचे सांगून दुचाकीवर हेल्मेट घालण्याचे आवाहन केले़ पोलिसांनी केलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत केले जाते आहे़