शनिवारी (दि. ५) सकाळपासून पाण्डेय हे आडगाव पाेलीस ठाण्यात तळ ठोकून होते. त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच दुपारी शांतता समिती सदस्य, पोलीसपाटील, पोलीसमित्र यांच्याशी संवाद साधला. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्येक नागरिक साध्या वेशातील पोलीस असून, त्यांनी जनसमस्या गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. पोलीसपाटील वर्गाने कोरोनाकाळात केलेल्या कामाची पोलीस खात्याने दखल घ्यावी, पोलीस आयुक्तालयाकडून त्यांना प्रमाणपत्र मिळावे, बळी मंदिराजवळील वाहतूक समस्या सोडवावी. चौकातील हातगाडे, फेरीवाले, फळविक्रेते यांना हटवावे, अवैध दारूविक्री बंद करावी, निलगिरी बाग भाजीबाजार वाहतूक कोंडी, रस्त्यावर मांसविक्री बंद करा तसेच ओढा, माडसांगवी, शिलापूर गाव हद्दीत रस्त्यांवर व तपोवन, विडी कामगार, मिरची चौकात गतिरोधक बसवावे, तपोवनातील टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशा तक्रारी नागरिकांनी मांडल्या. यावेळी बहुतांश तक्रारी या महापालिकेशी संबंधित असून, त्यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.
बैठकीला पोलीस उपायुक्त अमोल तांबे, संग्रामसिंग निशानदार, प्रदीप जाधव, सीताराम गायकवाड, पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भगत, आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इरफान शेख, नगरसेवक उद्धव निमसे, नितीन माळोदे, सुरेश खेताडे, डॉ. मृणाल पाटील, अजिंक्य वाघ, शशिकांत राऊत, गजानन भोर उपस्थित होते.