दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होत रुग्णसंख्या सहावर गेल्याने तालुक्यातील नागरिक सतर्क झाले असून, दिंडोरी वणीसह विविध गावांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यास सुरुवात केली आहे. दिंडोरी शहरातील पेट्रोल पंपचालकांनी अंशत: पेट्रोल विक्री बंद केली आहे.इंदोरे येथील मुंबईत आरोग्यसेवक असलेली व्यक्ती भाजीपाल्याच्या वाहनातून घरी आली होती. त्यास कोरोनाची बाधा झालेली असताना त्याचे संपर्कातील कुटुंबातील दोन जण पॉझिटिव्ह आले तर इतर १५ जण निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला असतानाच दिंडोरी शहरानजीक असलेल्या निळवंडी येथील एकास बाधा झाल्याने खळबळ उडाली.सदर व्यक्तीवर दिंडोरीत एक खासगी दवाखान्यात शस्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यासही बाधा झाल्याने निळवंडीसह दिंडोरी व नातेवाईक असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचे संपर्कातील ३७ नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठवले आहे. या सर्वांच्या रिपोर्टची प्रतीक्षा असतानाच पुन्हा दिंडोरी येथील रहिवासी असलेल्या व मालेगाव येथे बंदोबस्तास गेलेल्या पोलिसासही बाधा झाल्याने शहरात घबराट पसरली आहे. मोहाडी येथील शेतकरी नेहमी नाशिक बाजार समितीत भाजीपाला विक्रीस जात होता, त्यालाही बाधा झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील प्रत्येक गावामधील शेतकरी भाजीपाला विक्रीस नाशिकला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.----------------------------अनेक गावांत कडकडीत बंदसरकारने लॉकडाऊन शिथिल करत काही व्यवसाय सुरू करण्यात परवानगी दिल्याने दिंडोरी नगरपंचायत क्षेत्रवगळता सर्व ठिकाणी दुकाने सुरू होत व्यवहार सुरू झाले होते; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व ठिकाणी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले जात आहे. दिंडोरीत नगरपंचायत अध्यक्ष रचना जाधव, उपाध्यक्ष कैलास मवाळ सर्व नगरसेवक मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी तातडीची बैठक घेत विचारविनिमय केला. यावेळी व्यापारी हार्डवेअर असोसिएशनने स्वयंस्फूर्तीने १७ मेपर्यंत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला बाजारही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दवाखाने, मेडिकल, दूध आदी अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील पेट्रोलपंपचालकांनी अंशत: पेट्रोल विक्र ी बंद केली आहे. शहरात आज सर्वत्र शांतता होती, तर वणी येथेही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. लखमापूर, मोहाडी, जानोरी आदी विविध ठिकाणी सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे. विविध गावात पुन्हा जंतुनाशक फवारणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे.
दिंडोरी तालुक्यात जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 8:52 PM