कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तालुक्यात हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण असल्याने व मृत्यूचे प्रमाणही वाढत चालल्याने युवकांनी पुढाकार घेत ऑनलाइन मीटिंग घेत सर्व जनतेला आवाहन करत येत्या ३० तारखेपर्यंत दिंडोरी शहरात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे दिंडोरी शहरासोबतच आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये ही जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात येत आहे.
जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल व दूध वगळता सर्व प्रकारची दुकाने १०० टक्के बंद असणार आहेत. त्यामुळे कोणीही दुकाने उघडण्याचा प्रयत्न करू नये, त्यावर कारवाई करण्यात येईल. भाजीपाला व रस्त्यावरील दुकानेही पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. याबाबत जनतेने हा निर्णय घेतला असल्याने प्रशासकीय यंत्रणाही यास सहकार्य करणार आहे. जनतेनेही विनाकारण घराबाहेर पडू नये आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जनतेच्या वतीने करण्यात आले आहे.
जनतेने सर्व नियमांचे पालन करावे व ४५ वयोगतील व पुढच्या नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ संदीप आहेर यांनी केले आहे.