सटाणा : कोरोनाबाधितांसह सोबतच तरुणांची मृत्यूसंख्या सटाण्यात ओढावल्याने अखेर शुक्रवार दि. १६ पासून १ मे पर्यंत पंधरा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. त्याला पहिल्या दिवशी शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बागलाणचे तहसीलदार जितेंद्र पाटील, इंगळे पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वा. येथील तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली.
सर्वपक्षीय बैठकीत माजी नगराध्यक्ष विजय वाघ, उपाध्यक्ष दीपक पाकळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, काकाजी सोनवणे, मनोहर सोनवणे, दत्तू बैताडे, राकेश खैरनार, राहुल सोनवणे, मनसेचे पंकज सोनवणे, मंगेश भामरे, जगदीश मुंडावरे,रत्नाकर सोनवणे, राजेंद्र राका, प्रदीप भांगडीया, विकास दशपुते, प्रदीप बच्छाव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
--------------
विनाकारण फिरणाऱ्यांना दणका
शहरात विनाकारण रस्त्यांवर हिंडणाऱ्या युवकांसह नागरिकांची पोलीस रॅपिड टेस्ट करणार असून त्यांची रवानगी कोविड सेंटर्स येथे करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच आस्थापना व दुकाने मागील दारातून सुरू ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली. शुक्रवार दि. १६ ते १ मे हा पंधरा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला असला तरीही शहरातील किराणा व भाजीपाला सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत सुरू ठेवण्यात आला आहे. मेडिकल दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार असून उर्वरित सर्व व्यवसाय व आस्थापना बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.