नाशिकरोड : कोरोना विषाणूमुळे जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या जैन चतुर्मासात जाहीर सामूहिकपणे प्रवचन, व्याख्यान आदी धार्मिक कार्यक्र म न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व जैन बांधवांनी सुरक्षित अंतर ठेवून वैयक्तिक स्तरावर मौन, जप, तप, आत्मध्यान आदी धार्मिक साधना करण्याची सूचना करण्यात आली आहे.श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, दिगंबर जैन श्रावक संघ, तेरापंथी श्रावक संघ या सर्व जैन श्रावक संघांचा चतुर्मास येत्या चार जुलैपासून सुरू होत आहे. यंदा अधिक महिना असल्याने चतुर्मास पाच महिन्यांचा असून त्याची समाप्ती ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे. चारही श्रावक संघांचे पर्युषण पर्व १५ ते २३ आॅगस्टदरम्यान आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी श्रावक संघाचे ध्यानयोगी आचार्य प.पू. डॉ. शिवमुनीजी म.सा. यांनी जैन साधू-साध्वी, श्रावक संघ यांना पत्र पाठवून चतुर्मासमध्ये जाहीर सामूहिकपणे प्रवचन, व्याख्यान व इतर धार्मिक कार्यक्रम न घेण्याचे सुचविले आहे.तसेच ज्या साधू-साध्वींनी चतुर्माससाठी ज्या संघाला अनुमती दिली होती, मात्र संबंधित संघ दूरवर असेल तर संबंधित साधू-साध्वी चतुर्मास स्थान बदलू शकतात. जैन बांधवांनीदेखील अशा परिस्थितीत आपल्या आजूबाजूच्या साधू-साध्वींच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे. इतर संघांकडूनदेखील चतुर्मास सामूहिकपणे नव्हे तर वैयक्तिक स्तरावर करण्याचा निर्णय लवकरच होईल, असे संबंधित संघाच्या जैन बांधवांनी सांगितले.------सध्या काळाचा प्रभाव असून, सर्वांनी यावेळेत धर्मध्यानामध्ये वेळ दिला पाहिजे. शासनाने जे नियम, अटी सांगितले आहेत त्याचे काटेकोर पालन करावे तसेच राष्ट्राच्या मदतीसाठी आपल्या अर्थचा सदुपयोग करावा.- प. पू. डॉ. शिवमुनीजी म.साअखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी श्रावक संघ
जैन चतुर्मासातील जाहीर प्रवचने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 10:49 PM