सिन्नर : सिन्नर सार्वजनिक वाचनालयाची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तालुक्यात वाचक चळवळ वृद्धिंगत करणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाने जिल्ह्यात सर्वाधिक वाचक नोंदवितानाच आर्थिक स्त्रोत वाढवत अडीच लाखांच्या वर नफा कमाविल्याबद्दल सभासदांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर केला. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा पार पडली. वाचनालयाची ग्रंथसंपदा ३७ हजारांच्या पुढे सरकली असून, नियमित वाचक वर्गणीदारांची संख्या मागील वर्षापेक्षा ६० ने वाढून ८५० वर गेली असल्याचे भगत यांनी आपल्या अहवालातून स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली अभ्यासिका, ग्रंथालय सप्ताह यांसह विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. यावर्षी वाचनालयाला शासनाकडून तीन लाख ८४ हजारांचे अनुदान मिळाले. मात्र, त्याचवेळी वाचनालयाचे स्वत:चे आर्थिक स्त्रोतही मजबूत झाले असल्याचे ते म्हणाले. पुढील काळात अभ्यासिका सुसज्ज करणे, सभागृहाची दुरुस्ती करणे यांसह विविध कामे करण्याचा मनोदय भगत यांनी व्यक्त केला. बाल व महिला विभागासह ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविण्याची वाचनालयाची तयारी असून, आगामी सुट्यांचा विचार करता बाल विभाग समृद्ध करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. संचालक चंद्रशेखर कोरडे यांनी सन २०१६-१७ च्या आर्थिक ताळेबंदचे वाचन केले. जिल्ह्यात सर्वाधिक वाचक वर्गणीदार नोंदल्याबद्दल व वाचनालयास नफा झाल्याबद्दल नामदेव कोतवाल यांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास सभागृहाने संमती दिली. विलास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह हेमंत वाजे यांनी आभार मानले. सभेस उपाध्यक्ष नरेंद्र वैद्य, संचालक पी. एल. देशपांडे, सागर गुजर, निर्मला खिंवसरा, अॅड. बीना सांगळे, सुजाता तेलंग, किशोर जाधव, राजेंद्र देशपांडे, रत्नाकर पवार, दशरथ लोंढे, रामदास गायकवाड, दत्ता जोशी, गो. स. व्यवहारे, विशाल गुजराथी, अॅड. श्रीराम क्षत्रीय, अशोक वर्मा, राजेंद्र अंकार, डॉ. बी. एन. नाकोड, ताराचंद्र खिंवसरा, प्रमोद चोथवे, विजय जाधव, आर. के. मुंगसे, मनोहर कासार, जयंत जाधव यांच्यासह सभासद उपस्थित होते. या आर्थिक वर्षात वाचनालयास २ लाख ७६ हजार ६२० रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती देण्यात आली. संचालक मनीष गुजराथी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सभागृहाने ते कायम केले. सन २०१७-१८ च्या उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक संचालक जितेंद्र जगताप यांनी मांडले. उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे यांनी अंतर्गत लेखापरीक्षकाच्या निवडीचा ठराव मांडला.
सार्वजनिक वाचनालयाची सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:13 AM