पाथरे : कोरोनाचे तालुक्यात दोन रुग्ण आढळून आलेल्या वारेगावसह पाथरे खुर्द व बुद्रुकमधील जनजीवन दोन आठवड्यांनंतर काहीसे पूर्वपदावर आले आहे. प्रशासनाने ही गावे सील केली होती. मात्र, सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून अत्यावश्यक कामांसाठी रहिवाशांना घराबाहेर पडता येणार आहे. गेले दोन आठवडे गावातील सर्व व्यवसाय ठप्प होते. यात किराणा दुकानांचादेखील समावेश होता. या काळात प्रशासनाने सर्वांचा घरात बसण्याचे आदेश दिले होते. दरम्यान गावातील सर्वेक्षण आटोपल्यानंतर आता गाव पूर्वपदावर येऊ लागले आहे. तिनही ग्रामपंचायतींच्या वतीने सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतची वेळ किराणा दुकाने व कृषी संबंधित व्यवसायांसाठी निश्चित केली आहे. याच वेळेत ही दुकाने यापुढे उघडी असणार आहेत. किराणा दुकानात दर्शनी भागात भावफलक लिहिणे, ग्राहकांना पक्के बिल देणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. पिण्याचे स्वच्छ पाणीपुरवठा करणारे खासगी फिल्टर प्लॅण्टदेखील सुरू करण्यात आले आहेत.-------आठवडे बाजारात स्थानिकांना प्राधान्यबुधवारचा आठवडे बाजार भरविण्यात येणार असून, फक्त स्थानिक व्यापाऱ्यांनाच तेथे दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनीच भाजीपाला विक्रीसाठी आणावा, बाहेरगावातील कोणीही खरेदी-विक्रीसाठी बाजारात येऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे. बाजारात अंतर ठेवून दुकाने मांडावीत, ग्राहकांनी खरेदीला येताना फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, अनावश्यक बाजारात किंवा गावात कुणीही फिरू नये. घराबाहेर पडताना मास्क बांधावा, वारंवार साबण, सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत, असे आवाहन पाथरे खुर्द, बुद्रुक व वारेगाव ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे.
पाथरे गावातील जनजीवन पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 9:26 PM