नाशिक : ‘जनस्थान’ व्हॉट्स अॅप ग्रुपच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्काराचे दिमाखात वितरण करण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, ज्येष्ठ कवी किशोर पाठक व ज्येष्ठ कलावंत कैलास पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आज सायंकाळी हा सोहळा रंगला. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार अॅड. विलास लोणारी, अभिनेते दीपक करंजीकर, सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार, ग्रुपचे अॅडमिन अभय ओझरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जोशी, पाठक व पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना सदानंद जोशी म्हणाले की, १९६९ पासून नाट्य कारकीर्दीला प्रारंभ केला. वडील बालगंधर्वांच्या नाटक कंपनीत, तर आई गायिका असल्याने कलेचा वारसा लाभला. माधवराव पवार, प्रभाकर पाटणकर यांच्यासारख्यांचे अभिनय पाहून समृद्ध होत गेलो. प्रवाहाबरोबर चालत राहिल्याने आपले डबके झाले नाही. कवी किशोर पाठक यांनी ‘जनस्थान’मधील प्रत्येक कलावंत अस्वस्थता घेऊन जगत असून, प्रत्येकाला सर्वोच्चाची, सर्वोत्तमाची आस असल्याचे सांगितले. ग्रुपचे भवितव्य उज्ज्वल असल्याचेही ते म्हणाले. कैलास पाटील यांनी ‘जनस्थान’चे स्वरूप काही वर्षांपूर्वी वासुदेव दशपुत्रे यांनी स्थापन केलेल्या सांस्कृतिक महामंडळासारखे असल्याचे सांगितले. महापौर अशोक मुर्तडक यांनी जनस्थान हा आनंदाचा समूह असल्याचे सांगत प्रेम करणारी माणसे हीच खरी संपत्ती असल्याचे नमूद केले. प्रारंभी गायक ज्ञानेश्वर कासार, आनंद अत्रे, आशिष रानडे यांनी नांदी सादर केली. त्यांना नवीन तांबट, सतीश पेंडसे (तबला), दिगंबर सोनवणे (मृदंग), अनिल दैठणकर (व्हायोलिन) यांनी संगीतसाथ केली. स्वानंद बेदरकर यांनी स्वागत केले. दीपक करंजीकर यांनी प्रास्ताविक केले. भूषण मटकरी यांनी सूत्रसंचालन केले.
‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार प्रदान सोहळा
By admin | Published: June 22, 2016 12:02 AM