नाशिक : जागतिक वन्यजीव सप्ताहच्या निमित्ताने दरवर्षी वन्यजीव जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात; मात्र हे उपक्रम केवळ या सप्ताहपुरते मर्यादित न ठेवता सातत्याने वर्षभर लोकसहभाग वाढविण्यासाठी राबवावे. जेणेकरून वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वाचा हातभार लागण्यास मदत होईल, असा कानमंत्र पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी दिला.उंटवाडी वनविश्रामगृहाच्या सभागृहात झालेल्या वन्यजीव सप्ताहच्या समारोपप्रसंगी वनविभागाच्या पश्चिम भागामधील उत्कृष्टपणे वन व वन्यजीव संरक्षणासाठी प्रयत्नशील राहिलेल्या आठ वनपालांसह वीस वनरक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी फुले अध्यक्ष म्हणून बोलत होते. प्रमुख पाहूणे म्हणून व्यासपिठावर जी.मल्लिकार्जुन, प्रशिक्षणार्थी उपवनसंरक्षक पंकज गर्ग, नितीन सिंग उपस्थित होते. यावेळी फुले म्हणाले, वन्यजीव संवर्धनासाठी वनमजूरांपासून वनरक्षक, वनपाल ते वनक्षेत्रपालपर्यंत सर्वांनी प्रयत्नशील राहणे काळाची गरज आहे. यासाठी वेळोवेळी भावी पिढीमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आपल्या परिक्षेत्रात आढळून येणाऱ्या वन्यजीवांची माहितीची नोंद ठेवावी. संयुक्त वनव्यवस्थापन, ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांना विश्वासात घेऊन लोकसहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशी सुचनाही यावेळी फुले यांनी बोलताना केली. यावेळी वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, कैलास अहिरे, रवींद्र भोगे यांच्यासह आदि उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांनी मानले.यांचा झाला गौरवमागील वर्षभराच्या कालावधीत वन व वन्यजीव संरक्षणाचे उल्लेखनीय कार्य करणारी शहरातील वन्यजीव संस्था इको-एकोच्या स्वयंसेवकांनाही प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट वनक्षेत्रपाल- सीमा मुसळे (पेठ), उत्कृष्ट वनपाल : रवींद्र सोनार (भंडारदरा),रामकृष्ण देवकर (ननाशी), गोरक्ष जाधव, अनिल साळवे (सिन्नर), सुनील झोपे (त्र्यंबकेश्वर) यांच्यासह वीस वनरक्षकांनाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच चिमणपाडा येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती सदस्य निवृत्ती राऊत यांनी त्यांच्या गावातील जंगलाचे संरक्षण करत चराईबंदी, कुºहाडबंदीसाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
वन्यजीव संवर्धनासाठी लोकसहभाग गरजेचा : शिवाजी फुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 5:05 PM
वन्यजीव संवर्धनासाठी वनमजूरांपासून वनरक्षक, वनपाल ते वनक्षेत्रपालपर्यंत सर्वांनी प्रयत्नशील राहणे काळाची गरज आहे.
ठळक मुद्देआठ वनपालांसह वीस वनरक्षकांचा गौरववन्यजीव सप्ताहचा समारोप