नाशिक- देशाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक चा क्रमांक देशात अकरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. मात्र, हा लौकीक कायम टिकवायचा असेल तर लोकसहभाग आवश्यक आहे. घरगुती कच-यावर प्रकिया करण्यात नागरीक आणि व्यवसायिकांचा सहभाग आवश्यक आहे. असे मत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी स्वच्छतेचे महत्वअधिक प्रकर्षाने सांगितले जाते.स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिकची कामगिरी अत्यंत चांगली आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी आणि केवळ स्पर्धा नव्हे तर निरोगी आयुष्यासाठी स्वच्छतेला महत्व दिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
प्रश्न- केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणातील यशानंतर आता काय स्थिती आहे?
डॉ. कुटे- नाशिक महापालिकेने गेल्यावर्षी चांगली कामगिरी केली आता हा लौकीक टिकवण्याचा आणि अधिक चांगली कामगिरी करण्याच निर्धार आहे. सन २०२०-२१ यावर्षाचे सर्वेक्षण सुरू झाले असून दोन त्रैमासिकांचे मुल्यमापनजवळपास संपले आहे. आता नवनवीन निकषांबरोबरच गेल्या वेळी जाणवणा-या उणिवा दुर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार बांधकामाचे निरूपयोगी साहित्यावर प्रक्रिया करण्याच्या कामाचा प्रामुख्याने समावेश आहे. याकामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
प्रश्न- महापालिका शहर स्वच्छतेसाठी नवीन कोणते प्रकल्प राबवित आहे?
डॉ. कुटे: महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच अन्य कच-याचीही विल्हेवाट लावली जाते. आता ई कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी एका खासगी कंपनीशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा कचरा नष्ट करणे किंवा रिसायकल करणे यासंदर्भात देखील काम सुरू होऊ शकेल. सध्या मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही याबरोबरच अन्य ई कचरा मोठ्या प्रमाणात निघतो. तो शास्त्रोक्तपध्दतीने नष्ट करण्यात येईल. त्याच बरोबर कचऱ्याबरोबर येणारे सॅनेटरी नॅपकिन्स, डायपर, बेबी पॅडस देखील योग्य पध्दतीने नष्ट करण्यासाठी देखील प्रस्ताव आहे.
प्रश्न- लोकसहभाग किती आवश्यक आहे आणि त्याची काय तयारी सुरू आहे?
डॉ. कुटे- स्वच्छता हा खरे तर लोकसहभागाचाच विषय आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणात देखील याबाबत अनेक अटी आहेत. घरगुती स्वरूपात अनेक नागरीक घरातील कच-याचे कंपोस्ट खत तयार करतात. परंतु त्यापलिकडे जाऊन दोनशे पेक्षा अधिक घरांची हाउसिंग स्कीम असेल तर विकासकांना कच-याची निर्गत करणे बंधनकारक आहे. हॉटेल्सबाबत देखील नियम आहेत. शहरातील काही मोठे हॉटेल्स कच-याची विल्हेवाट परीसरातच करतात. परंतु सर्वांनीच ती केली पाहिजे. कच-याची निर्मिती झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे किंवा कच-यापासून काही तरी वेगळे तयार करणे, रिसायकल करणे याला खूपच महत्व देण्यात आले आहे. त्यामुळे नागरीक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
मुलाखत- संजय पाठक