अभोणा : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर देश-विदेशातून येणाऱ्या भक्तांसाठी जनसुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली असून, त्यासाठी विश्वस्त मंडळाने वर्षासाठी सहा कोटी रु पयांची तरतूद केली आहे.जनसुरक्षा विमा योजनेंतर्गत न्यास परिसरासह मौजे सप्तशृंगगड येथील संपूर्ण महसूल व वनविभागाच्या हद्द, नांदुरी ते सप्तशृंगगड घाट रस्ता व पायवाट, चंडीकापूर ते सप्तशृंगगड साठ पायरींचा मार्ग आदिंचा समावेश यात करण्यात आला आहे. जनसुरक्षा विमा प्रकारामध्ये गडावर घडणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ला, चेंगराचेंगरी, वीज उपकरणे व तांत्रिक अपघात, विषबाधा, सीतकडा, परशुरामबाला व शिवालय तीर्थ परिसर आदि ठिकाणी घडणाऱ्या घटनांत मृत्यू होणाऱ्या मयताच्या कुटुंबीयांना किमान एक लाख रु पयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. कर्मचारी वर्गाच्या सुरक्षेसाठी कर्मचारी नुकसानभरपाई विमा उतरविण्यात आलेला आहे. याचा लाभ ३०० कर्मचाऱ्यांना होणार आहे. दुर्गम भाग व कामाच्या ठिकाणांवरील संभाव्य अपघाती घटनांचा विचार करत संबंधित विमा सुरक्षेची विशेष तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी हा विमा चैत्र व अश्विन नवरात्रोत्सवासाठी उतरविण्यात आला आहे. मात्र, न्यासाचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांच्या परवानगीने आता हा विमा दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीद्वारे घेण्यात आला असून, हा विमा ८ सप्टेंबर २०१६पासून पुढील एक वर्षासाठी राहणार असल्याची माहिती व्यवस्थापक सुदर्शन दहतोंडे यांनी दिली.(वार्ताहर)
देवीभक्तांसाठी जनसुरक्षा विमा योजना
By admin | Published: September 24, 2016 12:29 AM