नाशिक : सार्वत्रिक श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे अधिसूचना जारी करण्यात आली आहे़ नाशिक शहर, नाशिकरोड, गंगापूर या ठिकाणी मिरवणुकीच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी बारा ते मिरवणूक संपेपर्यंत या बदललेल्या मार्गावरून वाहतूक केली जाणार आहे़ वाहतुकीतील बदल - या कालावधीत निमाणी बसस्थानकातून पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस या पंचवटी डेपोतून सुटतील़ तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिकशहर व इतर ठिकाणी जातील, तर पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील़ रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील़नाशिकरोड गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग - नाशिकरोडला बिटको चौकातून मिरवणूक निघणार असून दुपारी चार ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गावरील बदलाची अंमलबजावणी केली जाणार आहे़ बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक शिवाजी महाराज पुतळा - देवीचौक - रेल्वेस्टेशन पोलीस चौकी - सुभाषरोड - सत्कार पॉइंट - देवळाली गाव गांधीपुतळा - खोडदे किराणा दुकान ते वालदेवी नदी देवळालीगावपर्यंत जाणार आहे़ विसर्जन कालावधीतील बदल -पंचवटी डेपो, निमाणी बस स्टॅण्ड, महामार्ग, सिडको इत्यादी विभागातून नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे जाणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बसेस दत्तमंदिर सिग्नल पावेतो जातील व तेथूनच परत येतील़ सिन्नरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेस व इतर वाहने उड्डाणपुलावरून जातील व परत येतील़ गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवली नदीपात्र - आनंदवली नदीपात्रात आसपासची नागरी वस्ती, गणेश मंडळे गणेश विसर्जनासाठी येत असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होते़ अशावेळी चांदशी गावाकडून आनंदवली नदीपात्र ओलांडून आनंदवलीगाव मार्ग गंगापूरला जोडणाऱ्या रस्त्यास येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चांदशीगाव ते आनंदवली नदीपात्र आणि आनंदवली नदीपात्र ते चांदशी गावपर्यंतचा मार्ग दोन्ही बाजूने (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे़ या काळात नाशिककडे येणारी व नाशिकहून चांदशीकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी आनंदवली पुलाकडे न जाता चांदशीगाव रोडने नाशिक तट कालवा येथून उजव्या बाजूने वळून कालव्यामार्गे मखमलाबादरोडने लागून रामवाडीमार्गे अशोकस्तंभ ते गंगापूररोड असे जातील व त्याच मार्गाने येतील़नाशिकरोड विभागातील नांदूरनाका ते सैलानीबाबा चौक व सैलानीबाबा चौक हा मार्ग दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चार वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे़ या काळात नाशिकरोड विभागातील नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणारी वाहने ही नांदूर नाका औरंगाबादरोडने तपोवनातील स्वामी जनार्दन पूलमार्गे जातील व त्याच मार्गाने येतील़ वाहतूक मार्गातील बदल पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलातील वाहने व या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी लागू राहणार नाही. (प्रतिनिधी)
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्था जाहीरं
By admin | Published: September 06, 2014 10:58 PM