नाशिक : जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर इतर विभागांचे उदा. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे घेण्यात येतात. त्याच रस्त्यांवर जिल्हा परिषदेमार्फतही कामे केली जातात. त्यामुळे ही रस्त्यांची कामे दुबार होत असल्याच्या तक्रारी येत असून, यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर कामे घेण्याआधी तसा प्रस्ताव पाठवावा व बांधकाम समितीच्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपस्थित राहवे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या उपस्थितीत बांधकाम समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत सर्वशिक्षा अभियान, ग्रामीण पाणीपुरवठा, पंतप्रधान ग्रामसडक योजना. बांधकाम विभाग तसेच लघुपाटबंधारे विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारित १३ रस्त्यांच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करण्यास ना हरकत दाखला देण्याबाबतचा ठराव अॅड. संदीप गुळवे यांनी मांडला त्यास डॉ. प्रशांत सोनवणे यांनी अनुमोदन दिले. तसेच या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत ज्या कामांना प्रशासकीय मान्यता तसेच वित्तीय संमती दिलेली आहे, अशा कामांना तातडीने कार्यारंभ आदेश देण्याबाबतची कार्यवाही करण्याचा ठरावह अॅड. गुळवेंनी मांडला त्यास डॉ. प्रशांत सोनवणेंनी अनुमोदन दिले. तसेच बैठकीस विनापरवानगी गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मागील बैठकीत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आलेले असतानाही त्याबाबत विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही, ही गंभीर बाब असल्याने यापुढे असे घडता कामा नये, अशी सूचना प्रकाश वडजे यांनी दिले. बैठकीस ज्योती माळी, सुशीला मेंगाळ व सोमनाथ फडोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकामची कामे नकोत बांधकाम समितीच्या बैठकीत ठराव संमत
By admin | Published: January 20, 2015 1:39 AM