नाशिक : लेखिका सुरेखा बो-हाडे यांनी मराठा विद्या प्रसारक समाजच्या नऊ कर्मवीरांच्या कथा आणि ‘सामाजिक पालक नीलिमाताई पवार’ या दहा पुस्तकांचे प्रकाशन सिन्नरला मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सिन्नरच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे ‘मविप्र समाज नाशिक कर्मवीरांचे योगदान’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते झाले. या पुस्तकांतून १०७ वर्षांची शैक्षणिक परंपरा असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा इतिहासच एकप्रकारे उलगडला जाणार आहे. या पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी संचालक हेमंत वाजे, शिक्षणाधिकारी डॉ. एस. के. शिंदेसिन्नर कॉलेजचे प्राचार्य डॉ.पी.व्ही. रसाळ, प्रकाशक विलास पोतदार, प्रा.डॉ पगार, प्रा.डॉ. बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीरांचे योगदान या विषयावर मान्यवरांची व्याख्याने झाली.
इन्फो
मविप्रचा प्रेरणादायी इतिहास
कर्मवीरांच्या कथा या कथामालेत कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर काकासाहेब वाघ, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर डी. आर. भोसले, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर बाबूराव ठाकरे, कर्मवीर विठ्ठलराव हांडे, कर्मवीर वसंतराव पवार या नेत्यांनी मराठा विद्या प्रसारक समाजासाठी आणि नाशिक जिल्ह्यातील सामाजिक विकासासाठी तळमळीने केलेले कार्य आणि या कर्मवीरांच्या जीवनातील कथा सुरेखा बो-हाडे यांनी मांडल्या आहेत. या कथांमधून नव्या पिढीला प्रेरणा व आदर्श मिळणार आहे.