नाशिक : आपण आयुष्यभर अनेक यातना सोसल्या; मात्र माणुसकी सोडली नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ‘जगा आणि जगू द्या’ हेच सूत्र अवलंबल्यास सगळे विश्व सुखी होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी केले. येथील इंदूमती पांडुरंग शिंदे यांच्या ‘गोष्ट एका सुंदर मुलीची’ या आत्मचरित्राचे प्रकाशन कलानगर येथे सपकाळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अभय बाग यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनाधिपती विनायकदादा पाटील होते. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी महापौर दशरथ पाटील, प्रा. सुहास फरांदे, नगरसेवक अश्विनी बोरस्ते, नंदिनी जाधव, सुरेश पाटील, माजी नगरसेवक त्र्यंबकराव गायकवाड, पांडुरंग शिंदे, लेखिका इंदूमती शिंदे, दीपक शिंदे, गजानन शिंदे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. इंदूमती शिंदे यांनी पुस्तकामागील आपली भूमिका स्पष्ट केली. अभय बाग व सुप्रिया देवघरे यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर जाधव यांनी आभार मानले. केशवराव भोसले, नवनाथ पाटील, नंदकुमार जाधव आदि मान्यवरांसह रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘गोष्ट एका सुंदर मुलीची’ या आत्मचरित्राचे प्रकाशन
By admin | Published: December 08, 2014 1:52 AM