नाशिक : मखमलाबाद परिसरातील गंगावाडीच्या कालव्यात पडलेल्या एका युवकाला वाचविण्यासाठी भोसला मिलिटरी कॉलेजमधील एनसीसीच्या दोन रामदंडी विद्यार्थ्यांनी जीवाची बाजी लावून पाण्यातून बाहेर काढले. मात्र, प्रयत्नांची शर्थ केल्यानंतर केवळ काही क्षण उशीर झाल्याने युवकाला प्राण गमवावे लागल्याने सर्वांचाच जीव हळहळला.
प्रथमेश मच्छिंद्र तिवडे हा युवक मखमलाबाद परिसरातील कालव्यात पडला. खोल कालवा आणि पाणी जास्त असल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. थोड्यावेळात त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. याच भागात फिरण्यासाठी गेलेल्या भोसला कॉलेजमधील एनसीसीचे विद्यार्थी संदीप सोनी आणि आशुतोष जाधव आणि यांना गर्दी दिसली. त्यांनी इतरांना विचारले असता नुकताच एक युवक पाण्यात बुडाल्याची त्यांना माहिती मिळाली. जीवाची पर्वा न करता प्रशिक्षक आशुतोष यांनी पाण्यात उडी मारली. खोलवर गेल्यानंतर त्यांना एका युवकाच्या शरीराचा काही भाग हाताला लागला. पण त्याला एकट्याने वर आणणे आशुतोष यांना शक्य झाले नाही. त्यामुळे आशुतोष यांनी वर येऊन संदीपला दोरीसारखे साहित्य जवळपास आहे का, अशी विचारणा केली. मात्र, तिथे दोरी उपलब्ध नसल्याने. अखेर त्यांनी दोघांनी स्वतःच्या पॅटचे बेल्ट काढले. तसेच उपस्थितांकडील बेल्ट जमा करत सर्व बेल्ट एकत्रित बांधून आशुतोष खाली गेले आणि त्यांनी बुडालेल्या युवकाच्या अंगाभोवती ते बांधले आणि त्याला प्रचंड प्रयत्नांती वर काढण्यात आले. त्यानंतर आशुतोष व संदीप यांनी त्यांच्या छाती, पोटावर दाब देत शरीरातील पाणी काढून जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्याचा उपयोग झाला नाही. प्रथमेशची कोणतीच हालचाल नसल्याने तातडीने तो देह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र, तो युवक मृत झाला होता. काही क्षण आधी तिथे उभ्या असलेल्या बघ्यांपैकी काहींनी प्रयत्न केले असते तरी त्या युवकाचा जीव वाचू शकला असता.
चौकट
प्राऊड रामदंडी
जीवाची पर्वा न करता आशुतोष व संदीप यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याबद्दल भोसलाच्या या एनसीसी छात्रांचा गौरव करण्यात आला. त्यांना कमांडिंग ऑफिसर एनसीसी वन महाराष्ट्र बटालियन चे कर्नल वत्त्सा यांच्या हस्ते ‘प्राऊंड रामदंडी’ बॅज लावून गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.उन्मेष कुलकर्णी,उपप्राचार्य एस.डी. कुलकर्णी,मेजर विक्रांत कावळे, श्रीमती एस.एस.कुलकर्णी आदी उपस्थित होते.
फोटो
०५भोसला
आशुतोष जाधव, संदीप सोनी यांचा सत्कार करताना कर्नल वत्त्सा. समवेत प्राचार्य डाॅ. उन्मेष कुलकर्णी.