नाशिक : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे नाशिक ते पुणे रेल्वेने अवघ्या दोन तासांत पोहोचणे नजीकच्या भविष्यात शक्य होऊ शकणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला असून, आता हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीला पाठविला जाणार आहे.
राज्यातील रेल्वे मार्गाला गती देण्याच्या उद्देशाने राज्याच्या काही भागातील रेल्वे प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) यांनी तयार आराखडा सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत. त्यातील नाशिक आणि पुणे हे दोन जिल्हे मुंबईच्या सुवर्णत्रिकाेणातील एक महत्त्वाचा घटक आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांची चांगली प्रगती झाली आहे. मात्र, रेल्वेचा थेट मार्ग नसल्याने या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गतिमान रेल्वेचा पर्याय उपलब्ध नाही. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची यापूर्वीदेखील काहीवेळा सर्वेक्षणे झाली आहेत. मात्र, सर्वेक्षणानंतर सर्व कामे पुन्हा थंड बस्त्यात गेली. महसूल वाढीबरोबरच कृषी, पर्यटन, उद्योगवाढीस बळ मिळणार असून, औद्योगिक व कृषी क्षेत्राचा माल आयात-निर्यातीस चालना मिळू शकणार असल्याचे गुरुवारी बैठकीत सांगण्यात आले. तसेच पुण्याहून शिर्डीला जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांचीदेखील सोय होऊ शकणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत. कॅबिनेटच्या मंजुरीला हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यानंतर भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
इन्फो
२० टक्के भार उचलण्यास राज्याची मंजुरी
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला रेल्वे बोर्डाने यापूर्वीच मंजुरी दिली होती. आता राज्य शासनाने या प्रकल्पातील खर्चापैकी २० टक्के म्हणजेच ३ हजार २०८ कोटी रुपयांचा वाटा उचलण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविल्याने येत्या काही वर्षांत पुणे-नाशिक या थेट मार्गावर रेल्वे धावू शकणार आहे. गत दीड दशकांपासून सातत्याने या प्रकल्पाबाबत विविध स्तरावरून पाठपुरावा केला जात होता. त्या प्रयत्नांना नवीन दशकात यश येण्याची चिन्हे आहेत.
इन्फो
देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे
नाशिक आणि पुणे या दोन्ही महानगरांदरम्यान देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे भविष्यात धावणार आहे. हा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प केंद्र, राज्य सरकार आणि वित्तीय संस्थांच्या भागीदारीतून उभा राहणार आहे. १६ हजार कोटींच्या या सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी २०-२० टक्के आणि वित्तीय संस्था ६० टक्के गुंतवणूक करणार आहेत.
इन्फो
२३५ किलोमीटरचा मार्ग
सेमी हायस्पीड रेल्वे बरोबरच सध्याची प्रवासी आणि मालगाडी धावण्यासाठी या २३५ किलोमीटर मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्यांदाच तयार केला जाणार आहे. पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक असा हा मार्ग राहण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे.
इन्फो
अशा रचनेचा प्रस्ताव
पुणे ते हडपसर हा मार्ग एलिव्हेटेड राहणार आहे. हडपसर ते नाशिकमार्ग भूभागावर राहणार आहे. २३५ किलोमीटरच्या या मार्गात १८ बोगदे प्रस्तावित आहेत. रेल्वे फाटकावर क्रॉसिंगची समस्या टाळण्यासाठी ४१ उड्डाण पूलदेखील प्रस्तावित आहेत. सेमी हायस्पीड रेल्वे वेगाने धावण्यासाठी अत्याधुनिक रचना असणारे सहा डबे प्रारंभीच्या काळात राहतील. त्यानंतर आवश्यकतेनुसार डब्यांची संख्या १२ ते १६ पर्यंत वाढविता येणार आहे.