नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बीएससी पदवी परीक्षेच्या द्वितीय वर्षातील गणित लिनिअर अल्जेब्रा या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी सखोल चौकशी करून भविष्यात असा गैरप्रकार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी, तसेच विद्यापीठाच्या उपकेंद्राला मंजुरी मिळावी, अशी मागणी राज्यपाल, शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित पाटील यांनी कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि शिक्षणमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे विद्यापीठाच्या गणित विषयाच्या पेपरफुटीची घटना नाशिक येथील एका महाविद्यालयात घडली. दोन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ईमेल हॅक करून सदर गैरप्रकार केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी चौकशी समितीने अहवाल सादर केला. दरम्यान, या प्रकरणी शिक्षणातील तज्ज्ञ मंडळींसमवेत चर्चा केल्यानंतर काही मुद्दे निदर्शनास आले. महाविद्यालयातील शिकावू विद्यार्थी पेपरफुटी प्रकरणात हॅकिंगचा असा गैरप्रकार करू शकतात, तर इंटरनेटमधील तज्ज्ञ मंडळी हा गैरप्रकार सहन करू शकतील. त्यामुळे पुढील काळात कोणत्याही विद्यापीठात असा गैरप्रकार घडू शकतो. त्यामुळे यासंबंधी सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना सायबर सिक्युरिटी आॅडिट बंधनकारक करावे. महाराष्ट्र पोलीस, विद्यापीठ व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्लब स्थापन करून याबाबत जनजागृती करावी, तसेच पुणे विद्यापीठाचे नाशिक व नगर उपकेंद्र सुरू करून यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठातील पेपरफुटी प्रकरणी चौकशी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:19 AM