नांदगाव : शासकीय नियमांचे पालन न करणे व तोंडाला मास्क न लावणाऱ्या नांदगाव शहरातील २२ नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा व मास्क लावण्याचा नागरिकांना पडलेला विसर यामुळे निर्माण झालेली भीती खरी ठरवत, शहरात एकाच दिवशी तेरा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार, नांदगावचे तहसीलदार अखेर बुधवारी रस्त्यावर उतरले व त्यांनी केलेल्या कारवाईत बावीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर सराफ फाट्याजवळील कापड विक्रेत्याच्या दुकानाला सील करण्यात आले.
दिवाळीनंतर कोरोना गेला... अशी समजूत करून घेताना शहरातील सोशल डिस्टन्सिंग शून्यावर आले. त्यातच तुळशीच्या लग्नानंतर लगीनघाई सुरू झाली. लग्नमुहूर्ताच्या तारखा निघाल्याने बस्ते सुरू होऊन अनेक दुकानातून खरेदीची झुंबड दिसू लागली आहे. ग्रामीण भागात लग्नाएवढेच महत्त्व बस्त्याला असते. वधू व वर पक्षाचे लोक कापड, साड्या, ड्रेस पसंतीसाठी गर्दी करतात. निम्मे लोक दुकानात व निम्मे रस्त्यावर रेंगाळतात. याची प्रचिती कारवाईसाठी गेलेल्या पथकालाही आली.
कापड दुकानदार कारवाईत सापडले तेरा पॉझिटिव्ह हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संकेत मानून तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी मनमाड-नांदगाव पालिका व तालुक्यातील आरोग्य विभागासह यंत्रणेची आढावा बैठक घेतली व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आवश्यक सूचना देऊन स्वत: कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.
मात्र ज्यांनी म्हणून अशा प्रकारची कारवाई करावी अशा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती जाणवली. शासकीय कामासाठी ते बाहेर असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली. दरम्यान, प्रशिक्षित उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पालिका अधिकारी राहुल कुटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
(फोटो ०२ नांदगाव)
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याने सराफ फाटा येथील कापडविक्रेत्याच्या दुकानाला सील करताना दयानंद जगताप, उदय कुलकर्णी, संतोष मुटकुळे आदी.
===Photopath===
021220\02nsk_36_02122020_13.jpg
===Caption===
सोशल डिस्टंसीगचे पालन करीत नसल्याने सराफ फाट्यावरील कापडविक्रेत्याच्या दुकानाला सील करताना दयानंद जगताप, उदय कुलकर्णी, संतोष मुटकुळे आदी.