दिंडोरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी नागेश येवले यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत संचलन व तपासणी मोहीम राबविली. यात दिंडोरी येथील धुमणे लॉन्सवर कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी विनापरवानगी विवाह सोहळा साजरा केला जात होता. या ठिकाणी शासनाने कोविड नियमांतर्गत निश्चित केलेल्या संख्येपेक्षा जास्त व्यक्ती विवाह सोहळ्यास उपस्थित होत्या. यामुळे नगरपंचायत प्रशासनाने लॉन्स मालकास दहा हजार रुपयांचा दंड केला. तसेच लग्न सोहळ्यास उपस्थितांपैकी १२ विनामास्क वऱ्हाडी आढळून आल्याने वरपित्याकडून ६००० रुपये दंड वसूल केला. लॉन्सचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नगरपंचायतीने पुढील आदेश होईपर्यंत लॉन्स सील केले आहे.
तसेच शहरातील पालखेड रोड येथील कुलस्वामिनी रेडिमेड या कपड्याच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. सदर दुकानचालकास ५ हजार रुपयांचा दंड करून सदर दुकान सील करण्यात आले. याशिवाय, विनामास्क फिरणाऱ्या दोन व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
इन्फो
भाजी-फळे विक्रीस परवानगी
दिंडोरी शहरात रोज भरणाऱ्या भाजी बाजारात फक्त भाजी व फळे विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. इतर वस्तूंची दुकाने लावणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून दुकान जप्तीची कारवाई करण्यात येईल व गुन्हा दाखल करण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.