नाशिक : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय असलेले संजय पुनमिया यांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमिनी खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यांनी जोडलेला सातबाराचा उताराच बनावट असल्याचे पुढे आले. उपनिबंधकांच्या तक्रारीवरून सिन्नर पोलीस ठाण्यात पुनमिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी त्यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत तक्रार अर्ज दिला आहे. २००७ साली पुनमिया यांनी सिन्नर तालुक्यात महामार्गालगत जमिनींच्या खरेदीसाठी बनावट सातबाराचे उतारे सादर करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार निबंधक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी पुनमिया यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुनमिया यांची पोलीस कोठडी मिळावी यासाठी मुंबई पोलिसांशी संपर्क केला आहे. न्यायालयीन कोठडी संपताच त्यांना नाशिक पोलिसांच्या हवाली करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात असताना पुनमिया यांच्या वकिलाकडून न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर येत्या गुरुवारी (दि. २१) सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
फरार आयपीएस पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचा निकटवर्ती असलेल्या पुनमियाविरुद्ध दाखल झालेला हा पहिला गुन्हा नसून बारावा गुन्हा आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध मुंबईमधील विविध पोलीस ठाण्यांत खंडणी वसुलीसाठी धमकावणे, खंडणी गोळा करणे, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
--कोट--
सिन्नर पोलीस ठाणेअंतर्गत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संजय पुनमियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात असून त्यास न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे. त्याचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयाकडे विनंती केली असून न्यायालयाने ती मान्य केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून जमीन सिन्नरमधील असल्याचे तपासात पुढे येत आहे.
- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण