नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये एका मुख्याध्यापिकेच्या दुकानातील गुलाबी गणवेश खरेदी करण्यास शिक्षण समिती सभापती प्रा. सरिता सोनवणे आणि उपसभापती प्रतिभा पवार यांनी विरोध केला असतानाही मनपाच्या अनेक शाळांमध्ये हेच गणवेश वाटप करण्यात आले. महापालिकेने स्वातंत्र्य दिनाच्या आत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे आदेश दिले होते, त्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांमध्ये गणवेशाचे वाटप झाले खरे, परंतु अनेक ठिकाणी ठेकेदारांनी बाजी मारून गणवेश दिल्याचे वृत्त आहे.गेल्या वर्षी हा मुद्दा गाजला होता. त्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा प्रकार मोडीत काढला होता. त्यानंतर आता मात्र एका मुख्याध्यापिकेच्या कुटुंबीयांचे कपड्याचे दुकान असून, त्यांच्याकडूनच गुलाबी गणवेश खरेदी करण्याचा आग्रह सुरू होता. शिक्षण सभापती प्रा. सरिता सोनवणे आणि उपसभापती प्रतिभा पवार यांनी त्यास विरोध केला होता. मात्र अनेक ठिकाणी हेच गणवेश खरेदी करण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेषत: आडगाव येथील मनपा शाळेतील सुमारे हजार मुलांना हेच गणवेश देण्यात आल्याचे वृत्त आहे.महापालिकेच्या शाळांमधील मुलांना गणवेश खरेदी करून देण्याचे अधिकार विकेंद्रित करण्यात आले असून, शालेय व्यवस्थापन समितीला याबाबत अधिकार देण्यात आले आहे. तथापि, खरेदीवर अनेकदा नगरसेवक किंवा ठेकेदारांचे प्राबल्य असते आणि ते सांगतील त्यांच्याकडूनच खरेदी करावी लागते.
वादग्रस्त गुलाबी गणवेशांचीच खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 12:58 AM