पंचवटी : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या आठवड्यापासून कडक लॉकडाऊन जाहीर करून बाजार समिती बंद केल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता बाजार समितीतील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतमाल शिवार खरेदी करत आहेत. तर काही शेतकरी व्यापाऱ्यांपर्यंत शेतमाल पोहचविण्याचे काम करत आहे. त्यातूनच व्यापारी खरेदी केलेला शेतमाल मुंबई व गुजरातकडे रवाना करत आहे. मात्र व्यापारी स्वत:च शिवारात जाऊन खरेदी करीत असल्याने पाहिजे तसा बाजारभाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतमाल बाजार समितीत नेता येत नसल्याने काही शेतकऱ्यांना आपला शेतातील तयार शेतमाल जनावरांना तर काहींना शेतात खुडून टाकावा लागत आहे. यात भोपळा, काकडी, दोडका असा शेतमाल तर दोन तीन दिवसांनी खुडा करावा लागतो नाहीतर सदर माल तयार होऊन फुगत असल्याने खराब होतो सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणता येत नाही त्यामुळे शेतमाल खरेदी करता येत नसल्याने मुंबई आणि गुजरात राज्यात शेतमाल पाठविणाऱ्या व्यापारी वर्गाने आता थेट दिंडोरी, गिरणारे, मुंगसरा, दरी, आडगाव शिवार, दहावा मैल ग्रामीण भागात जाऊन शिवार शेतमाल खरेदी करून तो तात्पुरत्या स्वरूपात थाटलेल्या शेडमध्ये पॅकिंग करून मुंबई व गुजरातमध्ये पाठविला जात आहे. सर्व प्रकारच्या माल वाहतुकीला परवानगी असल्याने व्यापाऱ्यांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी अडचण निर्माण होत नाही. परिसरात राहणारे शेतकरी देखील एकत्र येऊन आपापल्या शेतातील फळभाज्या चारचाकी वाहनात भरून व्यापाऱ्यांनी मांडलेल्या शेडमध्ये पोहचविण्याचे काम करत आहेत. बाजार समिती बंद असल्या कारणाने शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा हमी भाव मिळत नाही त्यामुळे ज्याठिकाणी १०० रुपये प्रति जाळी बाजार मिळायला पाहिजे त्याठिकाणी केवळ
६० रुपये जाळी भाव मिळत असल्याने शेतमाल फेकण्यापेक्षा पदरात जे मिळेल ते पाडून घेण्यात शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.