धान्य चाळण यंत्राची व्यवस्था शेतकरी हिताच्या दृष्टीने बाजार समित्यांनी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी शासनाने बाजार समित्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तथापि अनेक बाजार समित्यांनी अद्याप धान्य चाळण यंत्रे बसविलेली नाहीत, किंवा ज्या बाजार समित्यांनी असे धान्य चाळण यंत्र बसविलेले आहे तेथे त्याचा वापर परिणामकारकपणे केल्याचे दिसून येत नाही. यासंदर्भात सहकार व पणन मंत्री व कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात राज्यातील सर्व बाजार समित्यांनी धान्य चाळण यंत्र व मॉईश्चर मीटरची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासन पुरस्कृत ई-नाम योजनेंतर्गत तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गतही अनुदान तत्त्वावर राज्यातील अनेक बाजार समित्यांना धान्य चाळण यंत्रे मंजूर करण्यात आलेली आहेत. तथापि काही बाजार समित्यांनी अनुदान उपलब्ध असूनही धान्य चाळण यंत्र बसविण्याची तसदी घेतलेली नाही अथवा थेट नकार दर्शविलेला आहे. ही बाब गंभीर असून, बाजार समित्यांची स्थापना झालेली आहे, त्या उद्देशालाच छेद देणारी आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांनी विशेषत: ज्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया आदी शेतमालाची आवक आहे, त्यांनी तातडीने धान्य चाळण यंत्र बसवून घ्यावे तसेच आर्द्रता मापक यंत्र याचीही खरेदी करून शेतकऱ्यांसाठी त्याचा वापर करावा. याबाबत कार्यवाही करून पणन कार्यालयास अहवाल पाठवावा, असे पणन संचालक सोनी यांनी आदेश दिले आहेत.
इन्फो
यामुळे आवश्यक असते यंत्र!
राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणत असतात. त्यापैकी अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया आदी प्रकारच्या शेतमालाची चाळण यंत्राद्वारे साफसफाई करून त्यातील काडीकचरा वेगळा करणे आवश्यक असते. जेणेकरून या शेतमालाचा एफएक्यू दर्जा गाठण्यास साहाय्य होते. शेतकऱ्यास योजनेंतर्गत लागू असलेल्या शेतमालाकरिता किमान आधारभूत किमतीचा लाभ होतो.