नाशिक : अवकाळी पावसाने कांद्याचे केलेले नुकसान व त्यातच भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे झालेले हाल पाहता यंदाही नाफेड मार्फत उन्हाळ कांद्याची खरेदी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना दिले आहे.
या संदर्भात डॉ. पवार यांनी दिल्ली येथे गोयल यांची भेट घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांची हकीकत कथन केली. महाराष्ट्रातील एकूण कांदा उत्पादनापैकी सर्वाधिक कांदा नाशिक जिल्ह्यात होतो. चालू हंगामात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी बिगर मोसमी पाऊस आणि सोबत गारांसह अतिवृष्टी झाल्याने या नैसर्गिक आपत्तीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मिळेल त्या भावात कांदा विक्री करावा लागत असल्याने उत्पादन खर्च देखील भरून निघत नसल्याकडे गोयल यांचे लक्ष वेधण्यात आले. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करावा अशी विनंती पवार यांनी केली. त्यावर लवकरच नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यात येईल असे आश्वासन गोयल यांनी यावेळी दिले.