महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त भालचंद्र गोसावी, नगरसचिव श्याम बुरकुल यांच्या उपस्थितीत गुरुवारी ऑनलाइन महासभा झाली. महासभेच्या प्रारंभी डॉ. खालीद परवेझ यांनी अंदाजपत्रकात कब्रस्तानच्या जागा खरेदीसाठी तरतूद केली नसल्याचा आक्षेप नोंदविला. यासाठी तरतूद करावी, अशी मागणी केली. यानंतर शौचालयांसाठी जागा खरेदी करण्याचा विषय चर्चेला आला. यावेळी नगरसेवक खालीद परवेझ व मुस्तकिम डिग्निटी यांनी शौचालयांसाठी जागा खरेदी केली जात असेल तर कब्रस्तानसाठीदेखील जागा खरेदी करण्याची मागणी केली. कम्युनिटी मोबेलाइज कॉर्डिनेटर म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या प्रस्तावासह आशावर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याची सूचना उपमहापौर नीलेश आहेर यांनी केली, तर पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी सयंत्र खरेदी करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. यावेळी यासाठी सर्वपक्षीय समिती गठित करून बंगलोर येथील प्रकल्प पाहणीनंतरच प्रशासन निर्णय घेईल, असा ठराव मंजूर करण्यात आला. विषयपत्रिकेवरील सुवर्ण जयंती नगरोत्थान निधी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत सहा विविध विकासकामांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली तर रस्त्यांच्या कडेला असलेली धूळ व माती उचलण्यासाठी रोड स्विपिंग मशीनच्या खरेदीच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. उद्यानांच्या व चौकांचे नामकरणाचा विषयही मंजूर करण्यात आला. चर्चेत नगरसेवक मदन गायकवाड, सखाराम घोडके, सुनील गायकवाड, अस्लम अन्सारी आदींनी सहभाग घेतला.
इन्फो
तूर्त एकाच बसची खरेदी
विषयपत्रिकेवरील पंधराव्या वित्त आयोगांतर्गत बस खरेदी करण्याचा विषय चर्चेला आला. यावेळी जनता दलाचे नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांनी बसेस खरेदी केल्या जात आहेत; मात्र चालक, खर्च याचे नियोजन काय, असा सवाल उपस्थित केला. यावर आयुक्त गोसावी यांनी महापालिका एकच बस खरेदी करणार आहे. यासाठी चालक व इतर नियोजन करण्यात आले आहे. महापौर शेख यांनी पूर्ण नियोजनानंतरच अन्य बस खरेदी केल्या जातील, असे सांगितले.