नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थानीच गोदावरी नदी प्रदूषित होत असून त्यामुळेच मेाठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालनच राज्य शासनाकडून होत नसल्याचा ठपका ठेवत, लवादाने गाेदावरीतील पाणी अंघोळीच्या पात्रतेचे नाही, असा शेरा मारला आहे. हा शेरा त्र्यंबकेश्वरसंदर्भात असला तरी, महापालिका प्रशासनाने मात्र त्यावर आणखी गांभीर्याने घेत पाठपुरावा करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आगामी कुंभमेळ्यापूर्वी म्हणजेच २०२७ च्या आत गोदावरी खऱ्याअर्थाने तीर्थजल होऊ शकेल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकेकडून गोदावरी शुध्दीकरण होत नसल्याने उलट सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार येथील पर्यावरणप्रेमी किरण कांबळे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यावर राज्य शासनाला काही सूचना हरित लवादाने केल्या होत्या. त्याबाबत समाधानकारक कारवाई झाली नसल्याचे हरित लवादाचे म्हणणे असून त्याअनुषंगाने त्यांनी गोदावरी नदीतील पाणी अंघोळीयोग्य नसल्याचे नमूद केले आहे. त्र्यंबकेश्वर प्रकरणात राज्य शासनावर हरित लवादाने फटकारले असले तरी, नाशिक महापालिकेने मात्र, कार्यवाही सुरू केली असून आगामी कुंभमेळ्याच्या आत प्रकल्प पूर्ण झाल्यास गोदावरीत शुध्द जल प्रवाही होईल असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
नाशिक शहरातून १९ किलोमीटर गोदावरी नदी वाहते. त्यासाठी महापालिकेने १८०० कोटी रुपयांचा ड्राफ्ट डीपीआर तयार केला असून हा अहवाल केंद्र शासनाने मंजूर करून पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केल्यास केंद्र राज्य आणि नाशिक महापालिका यांच्या मदतीने गोदावरी नदीला शुध्द जल मिळू शकेल असे आयुक्त जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नाशिक शहरातून वाहणारे ६७ नाले आणि ४ उपनद्या शुध्द झाल्याशिवाय म्हणजेच त्यात मिसळणारे सांडपाणी थांबवल्याशिवाय गोदावरी शुध्द होणार नाही, असे सांगून ते म्हणाले, निरीच्या निकषानुसार १० च्या आत बीओडी असणारी दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आहेत, अन्य चार जुन्या केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी देखील शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे आयुक्तांनी सांगितले.
इन्फो...
रामकुंड परिसरातील काँक्रिटीकरण मुक्तीचे समर्थन
गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी रामकुंड परिसरातील तळ काँक्रिटीकरण हटवण्याच्या पर्यावरणप्रेमींच्या मागणीचे आयुक्त कैलास जाधव यांनी समर्थन केले. स्मार्ट सिटी सध्या हे काम करीत असल्याचे आयुक्त म्हणाले.