नाशिक : जग काय बोलते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या मतांनी काही फरकही पडत नाही. जे काही करायचे ते स्वत:लाच करायचे आहे. त्यासाठी स्वत:च्या योग्यतेबद्दलची विचारधारा ठाम असली पाहिजे. जीवनात पावित्र्य हेच काम आणि प्रमाण माना, असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू डॉ. अनिरुद्ध बापू यांनी श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीने आयोजित सोहळ्यात बोलताना केले. कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्री गुरुजी रुग्णालयाच्या आयुर्वेद विभागाच्या पॅकेजेस्चा शुभारंभ अनिरुद्ध बापू यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर होते. यावेळी अनिरुद्ध बापू यांनी सांगितले, आपण दुसऱ्यांच्या मतांचे खंडण करण्यातच वेळ घालवित राहतो. गोळवलकर गुरुजींनी असा वेळ कधीही घालविला नाही. सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची वृत्ती होती. आवश्यक तेथे जरूर विरोध करायचा; परंतु विरोध करण्यात वेळ घालवायचा नाही, असे त्यांचे सूत्र होते. आता गरज नसताना रुग्णालयांमध्ये रुग्णांना अॅडमिट करून घेतले जाते; परंतु समाजानेही आपली मानसिकता बदलण्याची गरज असून, आवश्यकता नसताना रुग्णांवर उपचार करण्याचा आग्रह धरणे म्हणजे डॉक्टरांना चुकीच्या मार्गावर नेणे आहे. रुग्णांचेही प्रशिक्षण होणे आवश्यक आहे, असेही अनिरुद्ध बापू यांनी सांगितले. डॉ. विनायक गोविलकर यांनी सेवाभावी वृत्तीने चालविल्या जाणाऱ्या श्री गुरुजी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीचा वेध घेतला. रुग्णालयाच्या पाठीशी गेल्या आठ वर्षांपासून समाज सतत उभा आहे. सांघिक भावनेतूनच रुग्णालयाची वाटचाल सुरू असल्याचेही गोविलकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वैद्य अश्विनी चाकूरकर व वैद्य सोनाली देशमुख यांनी आयुर्वेद पॅकेजेस्ची माहिती दिली. डॉ. गिरीश चाकूरकर यांनी प्रास्ताविक, तर प्रा. वृंदा गुडसूरकर यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार कडवे याने ईशस्तवन सादर केले. व्यासपीठावर श्री गुरुजी रुग्णालयाचे उपाध्यक्ष मुकुंद खाडीलकर, कार्यवाह प्रवीण बुरकुले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जीवनात पावित्र्य हेच प्रमाण माना
By admin | Published: June 15, 2015 12:10 AM