नाशिक : नि:स्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणाऱ्या गुणवंतांचा पूर्णवाद परिवारातर्फे झालेला गौरव हा त्यांच्या कार्याची पावती असून, त्यांच्या नि:स्वार्थ कार्याने समाजातील सर्वांना प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. अविनाश भिडे यांनी केले.पूर्णवाद विद्या कला नीती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या समारंभात वेदांचा प्रचार व प्रसार करणारे औरंगाबादचे वे. मु. श्रीराम धानोरकर गुरु जी यांना पूर्णवाद विद्या पुरस्कार, अहमदनगरच्या प्रख्यात चित्रकार श्रीमती अनुराधाताई ठाकूर यांना पूर्णवाद कला उपासक पुरस्कार व परभणीचे सुधाकरराव जोशी (हिंगणीकर) यांना पूर्णवाद समाजभूषण नीती पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजात सध्या असलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी या पुरस्कारार्थींचे कार्य दीपस्तंभासारखे असून, उद्याचे भविष्य असलेल्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही यावेळी भिडे यांनी नमूद केले.प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका विशद करताना आपल्या प्रास्ताविकात राहुल भावे यांनी हे पुरस्काराचे बारावे वर्ष असून, प.पू. डॉ. विष्णू महाराज सातारकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या पुरस्काराने जीवनातील महत्त्वाच्या अशा कला, विद्या व नीतीचे महत्त्व अधोरेखित होते, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र जोशी यांनी केले.‘कला व विद्या नीतीने जोडणे म्हणजे पूर्णवाद’याप्रसंगी आ. गुणेशदादा पारनेरकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्या व कलेला नीतीच्या माध्यमातून जोडणे म्हणजे पूर्णवाद. आधुनिकतेशी जवळीक करताना शास्त्र व परंपरा समजून घ्या, असे पूर्णवाद सांगतो. वेद व कला यांनी देशाला बांधून ठेवले असून, जो आचरणाने बांधील पण विचाराने मोकळा तो भारतीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पूर्णवाद विद्या कला नीती पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:35 AM