नाशिक : चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या घरगुती, सार्वजनिक मंडळे व देवी मंदिरांतील विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहितांच्या आगावू नोंदणीला प्रारंभ झाला आहे. पुरोहितांची मागणी पहाता वेळेवर धावपळ नको म्हणून आधीच शोधाशोध घेतली जात असून, नेहमीच्या पुरोहितांना आठवण करून देणारे फोन केले जात आहेत. शारदीय नवरात्राचे नऊ ते पंधरा दिवससर्वत्र सप्तशतीचे पाठ, आरती, अभिषेक, होमहवन आदींद्वारे जागर केला जातो. हे विविध धार्मिक कार्यक्रम शास्त्रशुद्धरीत्या, विधिवत पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली, पौरोहित्याखाली पार पाडावेत यावर भर असतो. नवरात्राच्या पहिल्या माळेपासून घटस्थापना, अभिषेक, आरती, उपवासाचा संकल्प, ललिता पूजन अर्थात पंचमी व सप्तमीपासून सुरू होणारे चंडियाग हवन, नवचंडी, षतचंडी, सहस्त्रचंडी याग, कुमारिका पूजन आदी विधी यथासांग पार पाडण्यासाठी पूजाच्या साहित्यासह ३ ते ७ ब्राह्मणांची गरज असते. मंडळ व देवी मंदिरातील धार्मिक विधींबरोबरच अनेकांच्या घरीही देवीचे नवरात्र साजरे केले जाते. वर्षभर घरात सुख-शांती नांदावी, घरातील सदस्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळावे यासाठी ब्राह्मणांकडून नवरात्राच्या पहिल्या माळेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत सप्तशतीच्या साध्या व संपुटीत पाठांचे वाचन केले जाते. वर्षभर पाठ करवून घेणे जमले नाही तरी नवरात्रात पाठ करवून घेण्यावर अनेकांचा भर असतो.
धार्मिक कार्यक्रमांसाठी पुरोहितांचे बुकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:44 AM