नाशिक : महापालिकेकडून पाणवेली हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, मात्र पाणवेली काही हटता हटत नसल्याचे दिसून येत आहे. तपोवन भागातील सरस्वती पुलाच्या खाली गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पाणवेलींनी आच्छादिले आहे. त्या पाश्व'भूमीवर नाशिक महापालिका गोदावरी संवर्धन विभागाचे पर्यावरण संवर्धनासाठी पुढे पावले टाकत असून, शहर हद्दीतील नदीपात्रातील पाणवेली मनपाच्या बचतगटांना देणार आहे. त्यामुळे गोदा पाणवेलीमुक्त होण्यास हातभार लागणार आहे.
चांदोरी, सायखेडा येथे गोदावरीवर पाणवेलींचा थर मोठ्या प्रमाणात साचतो. ग्रामस्थांच्या मदतीने गोदावरीला पाणवेलींपासून मुक्त केले जाते. मात्र, या पाणवेलींची विल्हेवाट लावणे डोकेदुखी ठरत होती. त्यावर पर्याय म्हणून नीफ जीवन या सेवाभावी संस्थेची मदत घेण्यात आली. पाणवेलींपासून जीवनोपयोगी वस्तू तयार करण्यासाठी आसामहून दोन प्रशिक्षकही बोलविण्यात आले. या प्रशिक्षकांमार्फत बचतगटांच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. महिलांनी या पाणवेलींपासून चहाच्या कपाखालील कोस्टर बनविले, तसेच पाणवेलींपासून सात ते आठ विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्यात आल्या. या वस्तू बनविण्याचे मशीनही सेवाभावी संस्थेने या महिला बचतगटाला पुरविले आहे. या वस्तूंचे ऑनलाइन मार्केटिंग सेवाभावी संस्थेकडून करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर गोदावरी संवर्धन विभाग गोदापात्रातील पाणवेली मनपाच्या बचतगटांना उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांना वस्तू बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जाईल.-या वस्तू होणार तयारलेडिज पर्स, कोस्टर, फुलदाणी, देवघरातील आसन, परडी, आकर्षक पिशव्या, आकर्षक पडदे-पाणवेलींमुळे प्रदूषण वाढते. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. जिल्हा परिषदेच्या धर्तीवर महापालिका गोदेतील पाणवेली बचतगटांना देतील. त्यापासून जीवनाश्यक रोजच्या वापरातील वस्तू तयार केल्या जातील. त्यामुळे पाणवेली विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लागेल. मनपातर्फे प्रयत्न सुरू आहेत.- विजयकुमार मुंडे, उपायुक्त, पर्यावरण विभाग मनपा