नाशिक : मुंबई नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे रिक्षातील महिलेला तिची पडलेली पर्स व त्यातील दागिने सुखरूप मिळाल्याची घटना घडली़ जनार्दन ढाकणे असे प्रसंगावधान राखून महिलेची पर्स परत करणाऱ्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे़ मुंबई नाक्यावर मंगळवारी सायंकाळी जनार्दन ढाकणे हे वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत होते़ त्यावेळी गोविंदनगरमार्गे येणाºया एका रिक्षातून महिलेची पर्स खाली पडली़ एरव्ही छोट्याशा पर्सकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही, परंतु कर्तव्यावर असलेल्या जनार्दन ढाकणे यांच्या नजरेस ही पर्स पडली़ त्यांनी पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये दोन तोळे सोने व रोख रक्कम आढळून आली़ त्यांनी तत्काळ ही बाब बिनतारी संदेश यंत्रणेमार्फत वरिष्ठांना कळविली़ पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवून मुंबई नाका पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या महिलेचा शोध घेतला़ यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांनी सदर महिलेला बोलावून घेतले व वाहतूक शाखेचे कर्मचारी जनार्दन ढाकणे यांच्या हस्तेच महिलेची पर्स परत केली़ यावेळी निरीक्षक करंजे यांनी जनार्दन ढाकणे यांचे कौतुक केले तर महिलेने ढाकणे यांचे आभार मानले़ वाहतूक शाखेतील कर्मचारी ढाकणे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस विभागातील सहकाºयांनीदेखील त्यांचे कौतुक केले.
वाहतूक पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे मिळाली पर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:34 AM