नाशिक : पर्युषण महापर्व हा सर्व पर्वांचा राजा आहे. ते एक लोकोत्तर पर्व आहे. निरंतर आत्मशुद्धीसाठी असलेल्या पर्युषण पर्वात पूर्वाचार्यांनी सांगितलेल्या महाकर्तव्यांचे सर्वांनीच पालन करावे, असे आवाहन आचार्य रत्नसेनसुरीजी म. सा. यांनी प्रवचनमालेचे पुष्प गुंफताना केले.टिळकवाडीतील श्राविक आराधना भवनमध्ये पर्युषण पर्वकाळानिमित्त आयोजित प्रवचनमालेला प्रारंभ झाला. यावेळी आचार्य रत्नसेनसुरीजी म. सा. यांनी सांगितले, पर्युषण म्हणजे उत्कृष्टरितीने सरळ बनविणारे पर्व होय. पापाची कापणी, पुण्याची पेरणी आणि शुद्ध धर्माची बांधणी म्हणजे पर्युषण पर्व होय. पर्युषण पर्व हे चारही बाजूंनी आत्म्याच्या निकट सान्निध्यात स्वत:ला मग्न ठेवते. पर्युषण महापर्वाची चाहूल लागताच सगळे जैन बांधव सज्ज होतात. प्रत्येकाच्या हृदयात वर्षभर केलेला पाप धुवून काढण्याची इच्छा रंगू लागते. प्रतिक्रमण करता करता हृदय क्षमापनाच्या भावनेने भरून येते. विश्वातल्या प्राणिमात्रांविषयी मैत्रीचा संकल्प करण्याची प्रवृत्ती तयार होते. भुतकाळाच्या कटूभावाचे विस्मरण होऊ लागते. प्रेमाचे स्नेहाचे झरे मनामनात पसरू लागतात. वसुधैव कुटुंम्बकम् याची अनुभती येते. सर्वांच्या रोमारोमात वसलेल्या या पर्वाला म्हणूनच पर्वाधिराज म्हटले जाते, असेही रत्नसेनसुरीजी महाराजांनी सांगितले. पर्युषण पर्वात आठ दिवस धर्मराजाचे साम्राज्य पसरते. गुरुभक्तांची मन:पूर्वक भक्ती होते. ब्रह्मचर्येचे पालन केले जाते. मनामध्ये घर करून असलेली वैरभावना, कटूभावना विसरून आत्मियतेने एकमेकांशी हितसंबंध जोडणे, अनादि काळापासून आत्म्यामध्ये वास केलेल्या द्वेष या दुर्वासनेपासून स्वत:ला मुक्त करून सर्व प्राणीमात्रांशी मैत्रीच्या मधुर नात्यात स्वत:ला जोडणे हीच या महापर्वाची विशुद्ध आराधना असल्याचे रत्नसेनसुरीजी महाराज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
निरंतर आत्मशुद्धीसाठी पर्युषण पर्वरत्न
By admin | Published: August 30, 2016 1:54 AM