लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असताना माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाला धक्का बसला. आमदार माणिकराव कोकाटे समर्थक १० नगरसेवकांच्या पाठिंब्यावर शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांनी बाजी मारली. उपनगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार प्रणाली गोळेसर (भाटजिरे) यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला.सिन्नर नगर परिषदेत माजी आमदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नगराध्यक्षांसह १९ नगरसेवक असताना शिवसेनेला उपनगराध्यक्ष निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत शिवसेना बंडखोर उमेदवार बाळासाहेब उगले यांना १५ तर शिवसेना उमेदवार प्रणाली गोळेसर (भाटजिरे) यांना १४ मते मिळाली.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांना एका ठिकाणी नगर परिषदेच्या सभागृहात मतदानाला न बोलवता ‘सिस्को वेबेक्स मीटिंग’द्वारे आॅनलाइन पद्धतीने मतदान घेण्यात आले. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजय केदारे यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करूनही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. नगरसेवकांनी घरबसल्या या मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान केले.शिवसेनेचे १९ मतदार असताना शिवसेना उमेदवार गोळेसर यांना १४ मते मिळाली, तर आमदार कोकाटे समर्थक १० नगरसेवकांच्या पाठिंब्यावर उगले यांना १५ मते मिळाली. शिवसेना नगरसेवक बाळासाहेब उगले यांच्यासह गीता वरंदळ, विजया बर्डे, सुजाता तेलंग व निरूपमा शिंदे यांनी उगले यांना मतदान केल्याने निवडणूक निकालाचा कल बदलला. शिवसेनेच्या सर्व १९ नगरसेवकांना प्रणाली गोळेसर यांना मतदान करावे, असा व्हीप व्हॉट्सअॅप द्वारे बजावण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना व्हीप द्वारे माहिती देण्यात आली होती. व्हीपचे उल्लंघन करणाºयाविरोधात कारवाई केली जाईल.- हेमंत वाजे,गटनेते, शिवसेना
सिन्नर पालिकेत वाजे गटाला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:34 PM