नाशिक : वाढत्या वयासोबत रक्तात चरबीचे प्रमाण वाढून रक्त गोठणे ही बाब नैसर्गिक आहे. दहा वर्षांपूर्वी मुलगा वडिलांना या कारणामुळे ‘बायपास’ उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जात होता; मात्र आता परिस्थिती बदलली असून दुर्दैवाने वडील मुलाला या उपचारासाठी हृदयरोग तज्ज्ञांकडे घेऊन येत असल्याचे चित्र आहे. मानसिक ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि निकृष्ट व अनियमित पद्धतीची आहारशैलीमुळे तरुण रक्तात ‘कोलेस्ट्रॉल’ वाढत असून, तारुण्यात हृदयाला धक्का बसत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. हृदयरोग म्हटला की पूर्वी वयाची साठी असलेली व्यक्ती डोळ्यापुढे येत होती; मात्र मागील दहा वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलली असून, या जीवघेण्या आजाराचा वयोगट झपाट्याने अलीकडे सरकला आहे. यामुळे हृदयरोगविकार तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसत आहे. वयाच्या तिशीमध्येच हृदयरोगाचा झटका नागरिकांना येत असल्याचे चित्र शहरासह जिल्ह्यातही पहावयास मिळत आहे. तरुण पिढी वाढती स्पर्धा, लालसा आणि असमाधानी वृत्तीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसते, यामुळे ताणतणावाचा सामना करावा लागतो. परिणामी व्यसनाधिनता, निकृष्ट आहाराला प्राधान्य अशा सवयी तरुणाईला जडल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या सवयींचा दुष्परिणाम थेट त्यांच्या हृदयालाच बंद करण्यापर्यंत जाऊन पोहोचला असून, ही अत्यंत गंभीर व चिंतेची बाब आहे.हृदयविकाराच्या तरुण रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढ हे एकमेव कारण असल्याचे निदान शहरातील तज्ज्ञांनी केले आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्याने अचानकपणे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी तयार होते आणि हृदयावर ताण निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका बसतो, असे डॉक्टरांनी सांगितले.ओल्या पार्ट्या ठरताहेत घातकआजकाल तरुणाईमध्ये लहान-लहान कारणांवरून ‘पार्टी’ करण्याचे फॅड वाढले आहे; पार्टी करणे चुकीचे नाही; मात्र ती ज्या पद्धतीने केली जाते ती चुकीची असून, अपवादानेच एखादी पार्टी सुकी होते अथवा सर्वच पार्ट्या ओल्या असतात. मद्यप्राशनासह तरुणाईकडून सोबत चवीला खाल्ला जाणारा ‘चकणा’ अत्यंत घातक ठरत असल्याचे मत हृदयरोगविकार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तळलेले पदार्थ, धूम्रपान, मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक ठरत असून, रक्तात कोलेस्ट्रॉल वाढीला निमंत्रण देणारे असल्याचे मत डॉक्टरांनी मांडले.हृदयरोग दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र कमी वयाच्या नागरिकांमध्ये ही अत्यंत चिंतेची बाब आहे. तारुण्यात हृदयरोगविकाराचा तीव्र झटका येणे हे अतिशय गंभीर आहे. यासाठी तरुणाईने आपल्या जीवनशैलीसह आहारशैली आणि विचारसरणीमध्येही सुधारणा करणे गरजेचे आहे. पुरेशी झोप, उत्कृष्ट पौष्टिक आहार-विहार, सकारात्मक विचारसरणी, ताणतणावापासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे, व्यसनांवर मात या उपाययोजना करण्यावर भर द्यावा. हृदयरोग आता या काही वर्षांमध्ये तिशीच्या घरात पोहोचला आहे. फॅशन म्हणून व्यसनाधिनतेच्या आहारी जाणे म्हणजेच स्वत:हून मृत्यू ओढावून घेण्यासारखे आहे.- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, हृदयरोगविकार तज्ज्ञया दहा वर्षांमध्ये हृदयरोग तीस-चाळीस वयोगटांत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या मागचे मुख्य कारण ताणतणाव आणि निकृष्ट पद्धतीचा आहार हे आहे. सकाळचा नाश्ता घाईघाईने करणे दुपारचे जेवण मध्यम तर रात्रीचे भोजन अत्यंत दमदार पद्धतीने करण्याकडे तरुणाईचा विशेष कल आहे. यामध्येही फळे, हिरवा भाजीपाला तरुणाई अपवादानेच पसंत करते. तेलकट व बेकरीची उत्पादने खाण्यावर अधिक भर दिला जातो. ज्या गोष्टी रेस्टॉरंटमध्ये सलाड म्हणून नागरिकांकडून खाल्ल्या जातात त्या सर्व मुख्य भोजनात समाविष्ट करणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलवाढ हे एकमेव कारण तरुणाईमध्ये हृदयरोगामागे दिसून येते. मद्यप्राशन व चकणा, धूम्रपान, बाहेरची तळलेले खाद्यपदार्थ खाणे तरुणाईने टाळणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.- डॉ. राहुल कै चे, हृदयरोगविकार तज्ज्ञ
‘कोलेस्ट्रॉल’मुळे बसतोय तरुण हृदयाला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:33 AM