नाशिकरोड : बिटको पोलीस चौकी येथे दोन कुटुंबामध्ये सुरु असलेला वाद सोडविताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपनगर पोलिस ठाण्यातील मधुकर तुकाराम दावले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, देवळालीगाव रोकडोबावाडी येथील प्रिती सुनील गवळी यांनी बुधवारी नणंद सत्यभामा साळवे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला. गुरुवारी सायंकाळी सुनील गवळी हा त्याच्या पत्नीसह बिटको पोलीस चौकीत येऊन भाऊ छबू गवळी, पुतण्या दीपक गवळी हे घरात येऊ देत नसल्याच सांगत होता. त्याचवेळी छबू गवळी, दीपक गवळी, सत्यभामा साळवे, मीना गवळी हेही पोलीस चौकीत आले. त्यांनी सुनील गवळी व पत्नी प्रिती गवळी यांना शिवीगाळ करत मारहाण करु लागले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक एम. डी. परदेशी, काकड, दावले हे भांडण करु नका म्हणून समजावून सांगत असताना छबू गवळी यांनी परदेशी यांच्याशी झटापट केली. इतरही पोलीस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केली. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी समजावत असताना शासकीय कामात अडथळा आणल्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांडण सोडविणाऱ्या पोलिसांनाच धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 1:39 AM