नाशिक : स्वच्छ शहर योजनेच्या सर्वेक्षणात नाशिक शहर पहिल्या दहात येण्यासाठी महापालिकेने आटापिटा करणे गैर नाही, मात्र उत्साही अधिकाऱ्यांनी अशाप्रकारचे आवाहन करणारे फलक कुठे रंगवावे, याचे भान न ठेवता चक्क कुंभमेळ्यात विशेष वाळू वापरून संवर्धन केलेल्या गांधीज्योतीच्या खाली असलेल्या वास्तुस आॅइलपेंटने रंगकाम केल्याने पर्यावरणप्रेमी विशेषत: पुरातन वास्तुंवर प्रेम करणाºयांना मोठा धक्का बसला आहे.महापालिकेची ‘कर्तबगारी’ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सदरचे काम थांबविण्यात आल्याची माहिती शहर अभियंता संजय घुगे यांनी दिली. या वास्तुला पुन्हा काळा रंग देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ शहर सर्वेक्षण मोहीम सध्या सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. केंद्र सरकारचे पथक कोणत्याही क्षणी शहरात धडकण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात ठिकठिकाणी भिंती रंगवून स्वच्छ शहर सर्वेक्षणात सहभागी व्हा, अशाप्रकारचे आवाहन नागरिकांना केले आहे.गेल्यावेळी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने नाशिक बाराशे गुणांच्या स्पर्धेत मागे पडले होते. त्या पार्श्वभूमीवर आता नागरी प्रतिसादासाठी आटापिटा करीत असली तरी कुठे रंगकाम करावे हेही लक्षात न आल्याने गांधीज्योतीच्या भोवती असलेल्या वास्तुवरच चक्क रंगकाम करण्यात आले आहे.२०१५-१६ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गांधीज्योतीसह परिसरातील मंदिरे एकसारखी दिसावी आणि पाषाण अधिक टिकावे यासाठी विशेष काम केले होते. नाशिकमधील व्यावसायिक अरविंदभाई पटेल यांचा या कामात हातखंडा असल्याने त्यांनी त्याची जबाबदारी घेतली होती. पाषाणाच्या वाळूचे ब्लास्टिंग करून मंदिराच्या बाह्य भिंती तसेच अन्य वास्तू नंतर रंगविण्यात आल्या.या कामासाठी खास ओडिशावरून कारागीर मागविण्यात आले होते. या कामासाठी नैसर्गिक साधने वापरण्यात आली होती. कुठेही सीमेंटचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे कुंभमेळ्यातील हा गोदावरी नदीवरील आध्यात्मिक भाग अत्यंत उठावदार दिसत होता. परंतु त्यावरच चक्क रंगकाम करण्यात आल्याने महापालिकेनेच यासंदर्भात केलेली सर्व मेहनत वाया गेली आहे.दगडांना असतो जीव...पुरातन वास्तु संवर्धनाचे काम अत्यंत प्रेमाने आणि मंदिर असेल तर भक्तीभावाने करणारे अरविंदभाई पटेल यांच्या मते हे एकप्रकारचे सेवा कार्य आहे. दगडांना जीव असतो आणि तेदेखील श्वास घेतात. त्यामुळे नैसर्गिक पाषाणाची वाळू तसेच अन्य साहित्य वापरून या वास्तु संवर्धनासाठी लेपन केले आहे. अर्थात, त्यावर आॅइलपेंटने रंगकाम केले असेल तर सर्वच मेहनत वाया जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पुरातन गांधीज्योतीच्या संवर्धनावरच घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:55 AM