नाशिक- आशिक है ये चोर नही है मै क्या करू, दिल पे कोई जोर नही मै क्या करू....दिल पे जोर नसल्याने प्रेम विवाह करणाऱ्यांना आई वडिलांची मात्र संमती हवी, नाही तर विवाह नोंदणी प्रमाण पत्र देणार नाही असा ठराव करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सायखेडा ग्राम पंचायतीला राईट टू लव्ह अंतर्गत कोर्टात खेचण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
पुणे येथील राईट टू लव्हचे काम करणाऱ्या ऍड विकास शिंदे यांनी ही नोटीस बजावली आहे. प्रेम विवाह आई वडिलांच्या संमतीशिवाय नसल्यास दोन्ही कुटुंबांना त्रास आणि मनस्ताप होतो त्यामुळे प्रेम विवाह करताना पालकांची संमती नसेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र न देण्याचा ठराव नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा ग्राम पंचायतीने केला आहे. त्याच्या विरोधात पुण्याच्या ऍड विलास शिंदे यांनी नोटीस बजावली आहे.
या संदर्भात ऍड शिंदे यांनी सांगितले की, हा ठराव भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मुलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे तातडीने रद्द करावा अन्यथा उच्च न्यायालयात सदरचा बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठराव रद्द करण्यात यावा यासाठी दाद मागणार असल्याबाबतची नोटीस संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिका-यांना पाठविण्यात आली आहे, असे ऍड शिंदे यांनी सांगितले.