सचिन सांगळे नांदूरशिंगोटेजिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नांदूरशिंगोटे गटात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सिन्नर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी नांदूरशिंगोटे एकमेव गट इतर मागास प्रवर्ग (पुरुष) साठी खुला असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या गटाकडे लागले आहे.सिन्नर तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच गट महिलांसाठी राखीव असून, नांदूरशिंगोटे एकमेव गट ओबीसीसाठी खुला असल्याने याठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या गटात तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत. गटातील नांदूरशिंगोटे पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला राखीव आहे, तर पांगरी गण सर्वसाधारण आहे. नांदूरशिंगोटे गण महिलांसाठी राखीव असल्याने इच्छुकांनी त्यांच्या सौभाग्यवतींना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या चर्चेचे फड पारावर रंगू लागले आहेत. गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत नांदूरशिंगोटे गट अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव होता. विधानसभा निवडणुकीत आमदार राजाभाऊ वाजे यांना नांदूरशिंगोटे गणात, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना पांगरी गणात आघाडी मिळाली होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना व भाजपा या दोन पक्षात काट्याची लढत होईल असे चित्र आहे. या गटात सन १९९२ ते २००७ पर्यंत माजी मंत्री तुकाराम दिघोळे व त्यानंतरची दहा वर्षे माजी आमदार कोकाटे यांचे वर्चस्व राहिले आहे. आमदार राजाभाऊ वाजे व पंचायत समिती गटनेते उदय सांगळे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर या गटाकडे लक्ष केंद्रित केले आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने शिवसेना व भाजपा यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी देताना मोठी डोकेदुखी ठरणार आहे. या गटात नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रुक, वावी व पांगरी या गावांची मोठी मतदार संख्या असल्याने निवडणुकीत या गावांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भेटीवर जोर देऊन चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना, भाजपा या दोन पक्षांबरोबरच राष्ट्रवादी, मनसे, रासप, कॉँग्रेस यांच्यासह अपक्ष उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नांदूरशिंगोटे व दोडी बुद्रुक या भागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. दोन्हीही पक्षांकडून युवकांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ यांच्या दृष्टीने त्यांना पुन्हा मिनी मंत्रालयात जाण्याची संधी आली आहे. तथापि, वाघ यांचे गेल्या काही दिवसांत तळ्यात-मळ्यात चित्र दिसून आल्याने ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतात हा उत्सुकतेचा विषय असणार आहे. शिवसेनेकडून नांदूरशिंगोटे येथील ग्रामपंचायत सदस्य व साई मॉँ युवा मंचचे अध्यक्ष दीपक बर्के, कांदा व्यापारी नीलेश केदार, मऱ्हळ खुर्द येथील रमेश कुटे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपाकडून वाघ यांच्या बरोबरच बाजार समितीचे संचालक लक्ष्मण शेळके किंवा त्यांचे पुत्र मंगेश शेळके, पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे यांचे पती व वावीचे उपसरपंच विजय काटे, व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक विनायक शेळके, मानोरी विकास संस्थेचे संचालक अजय सानप यांनी उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी पक्षातर्फे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गर्जे यांचे पुत्र दिग्विजय गर्जे यांना शेवटच्या क्षणी रिंगणात उतरवले जाऊ शकते. गर्जे यांनी गेली दहा वर्षे जिल्हा परिषदेत काम केले असल्याने त्यांना दांडगा अनुभव आहे. कणकोरीचे माजी सरपंच तथा रासपचे नीलेश जगताप यांचेही नाव चर्चेत आहे. नांदूरशिंगोटे पंचायत समिती गण महिलांसाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. गण राखीव झाल्याने अनेकांनी आपला मोर्चा गटाकडे वळविला आहे, तर पांगरी गण सर्वसाधारण खुला असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. नांदूरशिंगोटे गटात शिवसेना व भाजपा यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उमेदवारी मिळविण्यासाठीच लागणार ‘कस ’
By admin | Published: October 20, 2016 12:07 AM