नाशिक : लॉकडाऊन काळात सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या लढवत लोकांच्या बॅँक खात्यांवर डल्ला मारला. व्यवसाय ठप्प झाल्याने आॅनलाइन खरेदी-विक्रीला काही व्यावसायिकांकडून प्राधान्य दिले गेले. याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला विविध वस्तू खरेदी करायचे भासवून क्यु-आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडत शहरातील १८ व्यावसायिकांना एकूण ३ लाख ३७ हजार २४८ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयित सायबर चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.लॉकडाऊन झाल्यापासून शहरात नव्हे तर संपुर्ण देशभरात सायबर गुन्हेगार अधिकच सक्रीय झाले आहे. स्वत: ला ग्राहक बनवून तर कधी आरोग्य विमा कंपनी, तर कधी बॅँक किंवा फायनान्स कंपनी प्रतिनिधी भासवून लोकांच्या बॅँक खात्यामधून रक्कम गायब करण्याचा सपाटा लावल्याचे आता समोर येत आहे. शहर सायबर पोलीस ठाण्याकडे मार्च ते जुलै या दरम्यान अशा विविध तक्रारी दाखल झाल्याने त्या तक्रारींनुसार आता पोलिसांनी एकत्रितपणे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. काही दिवसांपुर्वीच ९५ नागरिकांना २३ लाखांना गंडा घातल्याचा असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नाशिककरांची मोठ्या प्रमाणात आॅनलाइन आर्थिक फसवणूक होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले.आपलेच दात अन् आपलेच ओठ...सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला ग्राहक भासवून शहरातील एकूण १८ व्यावसायिकांशी लॉकडाऊन काळात संपर्क साधला. त्यांच्या गुगल पे, फोन पे अॅपसारख्या युपीआय क्रमांकाच्या खात्यावर सुरूवातीला दहा रुपये पाठविले. व्यावसायिकांच्या बॅँक खात्यात दहा रुपये आल्याने त्यांना त्या सायबर गुन्हेगारांवर विश्वास बसला. त्याचा गैरफायदा घेत भामट्यांनी पुन्हा त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर थेट त्यांच्या बॅँक खात्याशी संलग्न असलेला क्यु-आर कोड पाठवून तो यांच्या पेमेंट अॅपद्वारे स्कॅन करण्यास सांगितला. मुळात तो ‘क्युआर’ पैसे स्विकारण्याचा होता. दोन हजारांपासून दहा हजारांपर्यंत प्रत्येकी व्यावसायिकाची फसवणूक झाली.
क्युआर कोड स्कॅनिंग फंडा; दहा रूपये देऊन हजारोे उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 3:17 PM
सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला ग्राहक भासवून शहरातील एकूण १८ व्यावसायिकांशी लॉकडाऊन काळात संपर्क साधला. त्यांच्या गुगल पे, फोन पे अॅपसारख्या युपीआय क्रमांकाच्या खात्यावर सुरूवातीला दहा रुपये पाठविले.
ठळक मुद्दे आपलेच दात अन् आपलेच ओठ...१८ व्यावसायिकांना एकूण ३ लाख ३७ हजार २४८ रुपयांचा गंडा