नाशिक : बदलत्या काळानुसार समाजाची परिस्थितीही बदलली असून पूर्वीच्या काळी शिक्षण घेण्यासाठी असलेल्या अडचणी संपुष्टात आल्या असून शिक्षण घेण्यासाठी आता पुरेशा प्रमाणात पालकांचे पाठबळही मिळत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी योग्य फायदा करून घेत माहिती व तंत्रज्ञानाचा आपले ज्ञान व कौशल्यवृृद्धीसाठी पुरेपूर वापर करून घेण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांनी केले आहे. माळी समाज सेवा समितीतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेण्यात आला. यावेळी बोलताना अनंता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करतानाच दूरदृष्टिकोन ठेवून ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले, तर विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करताना सोशल मीडियाचा सावधपणे वापर करणे गरजेचे असून, पालकांनी आपल्या पाल्यांना सोशल मीडियावरील गैरप्रकारांपासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे मत पोलीस जिल्हा उपअधीक्षक सचिन गोरे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तम तांबे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे, नगरसेवक संतोष गायकवाड, प्राचार्य दिनकर जानमाळी, उद्योजक चंद्रकांत बागुल, सुनील फरांदे यांच्यासह माजी नगरसेवक समाधान जाधव, राजेश सावंत, दौलतराव गांगुर्डे आदी उपस्थित होते. माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जागृती कोलगीकर यांनी केले. उत्तम बडदे यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रांतील यशवंतांसह पहिलीपासून ते उच्चशिक्षण क्षेत्रात चांगले गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या सुमारे सातशे विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
माळी समाज सेवा समितीतर्फे गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:38 AM