लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने गंगेच्या धर्तीवर नाशकातही गोदावरी नदीवर पाण्याची गुणवत्ता तपासणी करणारे संयंत्र बसविण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत लवकरच निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे. या संयंत्रामुळे गोदावरीच्या प्रदूषणाचे प्रमाण मोजण्याबरोबरच पाण्याची गुणवत्ताही दररोज तपासली जाणार आहे. महापालिकेने गोदावरी नदीसंवर्धन कक्षाची स्थापना केलेली आहे. या कक्षामार्फत गोदावरीत होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी संयंत्र बसविले जाणार आहे. या संयंत्रामार्फत प्रामुख्याने, नऊ प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यात बॉयोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड (बीओडी), केमिकल आॅक्सिजन डिमांड (सीओडी), टोटल सस्पेंडेड सॉलिड्स (टीएसएस), पाण्याचा पीएच तथा सामू, अमोनिकल नायट्रोजन, पाण्याचा रंग, तपमान, विरघळलेला आॅक्सिजन, आॅइल आणि ग्रीस या चाचण्यांचा समावेश आहे. ज्याठिकाणी पाण्याची पातळी नेहमी टिकून असते, तेथे सदर यंत्र बसविण्यात येणार असून, चाचण्यांच्या नोंदी दररोज उपलब्ध होऊन प्रदूषणासंबंधी उपाययोजना तातडीने करणे शक्य होणार आहे. आतापर्यंत गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी नमुने मेरी अथवा अन्य प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येत होते. परंतु, सदर संयंत्र बसविल्यास महापालिका स्तरावरच गुणवत्ता तपासणी दररोज करणे शक्य होणार आहे. महापालिकेने सदर संयंत्र खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. येत्या महिनाभरात प्रक्रिया पूर्ण होऊन यंत्रणा प्रत्यक्ष कार्यान्वित होईल, असा विश्वास गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी व्यक्त केला आहे. गंगा नदीत दहा ठिकाणी संयंत्रकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर संयंत्र गंगा नदीच्या पात्रात दहा ठिकाणी बसविलेले आहेत. गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता रोज तपासली जाते. गंगेच्याच धर्तीवर नाशिकमध्येही सदर संयंत्राचा वापर करण्याचा मानस होता. आयुक्तांनी त्यास संमती दिल्याने आता सदर संयंत्र मागविले जाणार आहे. गोदावरी नदीपात्रात पाणी टिकून राहणाऱ्या ठिकाणी सदर संयंत्र बसविण्यात येणार आहे. याशिवाय, अन्य ठिकाणच्याही पाण्याची तपासणी करणे शक्य होणार आहे.
गोदाजलाची गुणवत्ता तपासणी
By admin | Published: June 22, 2017 12:33 AM