अशोक देशपांडे
मॉल संस्कृतीमुळे छोटे व्यापारी व व्यवसाय धोक्यात आले. आॅफसेट प्रिंटिंगमुळे ट्रेडल प्रणाली वापरणारे टाइपसेटर्स कुशल असूनदेखील व्यवसायातून हद्दपार झाले. अॅटो स्टॅम्पिंगमुळे रबर स्टॅम्प बनविणारे धंदे पडले. डिजिटल फोटोग्राफीतून जुने फोटोग्राफर व्यवसायातून बाद झाले. ह्या परिवर्तनातून आजच्या आणि उद्याच्या तरुणांना अनेक गोष्टी वेळेत शिकण्यासारख्या आहेत तरच ते स्वत:च्या जीवनाचे समर्थ शिल्पकार स्वत: असतील व त्यांचे उद्याचे भविष्य उज्ज्वल असेल. माणसांच्या कौशल्यांचे पुनर्प्रशिक्षण करावे लागले व तो जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला व त्यामुळे गतिमान जीवनात यंत्राच्या तालावरती पळण्याच्या शर्यतीत नवीन पिढी फसत चालली आहे.तरुणांनो, उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच्या वेळेचा सदुपयोग करा. १९व्या व २०व्या शतकांत आपण प्रथम शिक्षण पूर्ण करून नंतर नोकरी, व्यवसायात जात होतो. आता २१वे शतक हे गतिमान युग झाले आहे. संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक माध्यमांनी जीवनाच्या गतिशीलतेत वाढ केली आहे. सर्व जगाचे भ्रमण क्षणार्धात करण्याची क्षमता इंटरनेटमुळे आपणास अनुभवता येते. अशा ठिकाणी काम करण्याचा अनुभव गरजेचा आहे. ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन व पूर्वीचे शिकलेले कालबाह्य ज्ञान परत घेण्याची इच्छाशक्ती, वेळ व पैसा नाही त्यांना खर्चिक शिक्षणाबरोबर अनुभवाची पुंजी व इन्कम वाढविण्याची गरज भासत आहे व हा वर्ग अधिक करून तरुणांचा आहे.कृती करणे ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाबरोबरच सामान्यज्ञान व व्यवहार ज्ञान असणे क्रमप्राप्त झाले आहे. अनुभवाने शिक्षण व प्रत्यक्ष कार्यपद्धती, कार्यक्षमता यातील दरी कमी करणे व नोकरीत, संस्थेत किंवा कारखान्यात आपल्या योग्यतेची प्रचिती चालकास किंवा मालकास सातत्याने देणे हे एक मोठे आव्हान तरुण पिढीपुढे उद्या असणार आहे. आपण कपडे, चैन, खाणे-पिणे, फॅशन इत्यादीसाठी (शरीराच्या बाह्य भागासाठी) अधिक पैसे खर्च करतो; पण खांद्याच्या वरती असलेले डोके, मन, बुद्धीसाठी आपल्या उत्पन्नातील पाच टक्केदेखील खर्च तरुण पिढी करताना दिसत नाही. काय शिकवायचे नाही हे लवकर व सातत्याने शिकावे लागत आहे. त्यावेळी अनेकांना कळते की, बदलत्या परिस्थितीत शिक्षणासारखे फार काही आहे म्हणून निरंतर शिक्षणाशिवाय तरुणांना पर्याय नाही. अनुभव व शिक्षण आकाशासारखे उत्तुंग आहे. ज्याला ते समजून घेण्याची, अनुभवण्याची इच्छा आहे तोच तरुण २०३०च्या कालखंडात हवे तसे यश संपादन करू शकतो.२०१९-२०२० मध्ये औद्योगिक क्रांतीच्या मानवी निर्मिती यंत्राने (रोबोट), कृत्रिम बुद्धिमत्तेने (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), माहिती तंत्रज्ञान प्रणाली (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअॅलिटी), आॅनलाइन बॅँकिंग, विनाचालक वाहन, मोबाइल इंटरनेट इ. नवीन निर्माण झालेली कामे करण्यास नवीन कौशल्य शिकावी लागली व यापुढेदेखील सतत बदलणाऱ्या परिस्थितीत टिकण्यासाठी सातत्याने शिकावे लागेल. हे वास्तव काहींनी स्वीकारताना जुन्या शिक्षणाचे विस्मरण व नवीन कौशल्याचे अंगीकरण करून घेतले ते उद्योग जगतात चांगल्यापासून उत्तमाकडे प्रवास करू लागले आहेत. जे करू शकले नाहीत त्यांची जीवनात पीछेहाट झाली. परिणामी सेवानिवृत्तीच्या दिशेने प्रवास करावा लागला. त्यामुळे अयशस्वी लोकांच्या मोठ्या समूहाला असे लक्षात आले की, २१ व्या शतकात ज्ञान हेच प्रभावी अस्र आहे.एकंदरीत चौथ्या औद्योगिक क्रांतीचे बदलते स्वरूप संक्षिप्तपणे असे असू शकते. १) स्पर्धा अधिक तीव्र होत चालली आहे. २) तंत्रज्ञान अधिक झपाट्याने बदलत आहे. ३) ग्राहक स्वत:च्या गरजांबद्दल अधिक आग्रही आहे. ४) व्यवसायाची आणि विपणनाची संकल्पना झपाट्याने बदल आहे. ५) नोकरी, उद्योग, व्यवसायात गुणवत्ता ही प्राणवायू सारखी अविभाज्य झाली आहे. ६) तरुणांना कॉम्प्युटर सॅव्ही, आॅनलाइन असल्याशिवाय जीवन जगता येणार नाही. ७) कायद्याच्या चौकटीत अधिक कडक होत चालल्या आहेत. ८) नोकरी, व्यवसायासाठी लागणारे कौशल्ये दिवसागणिक बदलत आहेत.गुणवत्ता व कौशल्य हीच आपली उद्याची ताकद : आपण किती वर्षे जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचे आहे. काय खातो यापेक्षा किती पचते ते महत्त्वाचे आहे. किती वाचले यापेक्षा चार नवीन कोणते शब्द लक्षात राहिले हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गुणात्मक आणि कलात्मक दृष्टिकोनातून जो वाचेल तोच वाचेल असे म्हणता येईल.