नाशिक- महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील विकास कामे करण्यासाठी प्रत्येकी सव्वा कोटी या प्रमाणे १६६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर कोरोनाचे संकट बघता वैद्यकीय विभागासाठी देखील २५ कोटी रूपये अतिरीक्त तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी दिली.
महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीने तयार केले असून लवकरच ते महासभेवर सादर होणार आहे. सध्या कोरोनाचा संकट काळ पुन्हा सुरू झाला असून दुसरीकडे महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आहेत. त्यामुळे नगरसेवक देखील विकास कामे होत नसल्याने हवालदिल झाले आहेत. या संदर्भात अंदाजपत्रक तयार करताना योग्य सांगड घातली असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
प्रश्न- गेल्या वर्षी कोरोनाचे संकट होते, आता पुन्हा संसर्ग वाढला आहे, त्यामुळे अंदाजपत्रकात वैद्यकीय विभागासाठी अंदाजपत्रकात काही विशेष तरतूद केली आहे काय?गिते- होय. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर महापालिकेला आपली रूग्णालये सज्ज करावी लागली. डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय केवळ कोरोना संसर्गासाठी राखीव ठेवावे लागले. तर नवीन बिटको रूग्णालय तातडीने सुरू करावे लागले. कोरोना चाचण्यांचे किट, इंजेक्शन्स खरेदी अशा अनेक प्रकारची खरेदी करावी लागली त्यामुळे सुमारे पन्नास कोटी रूपयांचा खर्च झाला. त्याचा विचार करून यंदा जुन्या बिटको रूग्णालयाच्या नुतनीकरणासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच बरोबर प्रशासनाने वैद्यकीय विभागासाठी केलेल्या तरतूदीच्या पलिकडे आणखी २५ कोटी रूपयांची अतिरीक्त तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना काळात महापालिका कुठेही कमी पडणार नाही.
प्रश्न- कोरोनामुळे गेल्या वर्षी केाणत्याही प्रकारे नागरी कामे झाली नाही आणि आताही पुन्हा कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर कामे होतील किंवा नाही याबाबत नगरसेवकांत चिंता आहे.गिते- नगरसेवकांची चिंता रास्त असली तरी नगरसेवकांची कामे व्हावीत यासाठी अंदाजपत्रकात प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. आयुक्तांनी त्यांच्या अंदाजपत्रकात नगरसेवक स्वेच्छाधिकार निधी आणि प्रभाग विकास निधी अशी एकूण चाळीस लाख रूपये तरतूद करण्यात आली आहे. या पलिकडे प्रत्येक नगरसेवकाला प्रभागात विकास कामे करण्यासाठी सव्वा केाटी या प्रमाणे १६६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रश्न- अन्य कोणत्या महत्वाच्या योजनांसाठी तरतूद आहे?गिते- बिटको रूग्णालयात पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण सुरू करणे, चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा बीओटीच्या माध्यमातून विकास तसेच महापालिकेच्या विद्युत पुरवठ्यासाठी सोलर याेजना यासाठी तरतूद करण्यात आली आहे.